28 February 2020

News Flash

वेतन थकविणाऱ्या ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयांची सुनावणी!

एआयसीटीईने देशभरातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयांना सुनावणीसाठी नोटीसा जारी केल्या आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

देशभरातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदे’चे (एआयसीटीई) नियम उघडपणे धाब्यावर बसवत असताना एआयसीटीईकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असते. याहीपेक्षा गंभीरबाब म्हणजे अनेक महाविद्यालये वेळेवर वेतनही देत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अध्यापकांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्यानंतर आता जाग्या झालेल्या एआयसीटीईने देशभरातील ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयांना सुनावणीसाठी नोटीसा जारी केल्या आहेत.

ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अध्यापकांना नियमित वेतन दिले जात नाही अशा ५८ महाविद्यालयांत महाराष्ट्रातील दहा महाविद्यालयांचा समावेश असून यात कर्जत-भिवपुरी येथील यादवराव तासगावकर अभियांत्रिकीच्या सात महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे खारघर येथील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पुण्यातील दोन अभियांत्रिकी महाविद्यालयांचा समावेश आहे. राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने यापूर्वीच एआयसीटीईच्या निकषांचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांची तपासणी केली असता दोनशेहून अधिक महाविद्यालयांमध्ये निकषांचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी व्हिजेटीआयमध्ये एआयसीटीईने शंभरहून अधिक महाविद्यालयांच्या केलेल्या चौकशीत या सर्व महाविद्यालयांमध्ये एआयसीटीईच्या निकषांचे पालन होत नसल्याचे आढळून आले. मात्र त्यानंतरही गेल्या दोन वर्षांत एआयसीटीईने या महाविद्यालयांवर ठोस कारवाई केलेली नाही की डिटीईने कारवाई केली. यातील गंभीरबाब म्हणजे मुंबई विद्यापीठाअंतर्गत तसेच राज्यातील अन्य विद्यापीठांअंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची तपासणी करणाऱ्या ‘स्थानिय चौकशी समिती’नेमकी कोणती शिफारस केली हे आजपर्यंत गुलदस्त्यामध्ये आहे. विद्यापीठाने या स्थानीय चौकशी समितीचा अहवाल आपल्या संकेतस्थळावर जाहीर करणे आवश्यक असताना आजपर्यंत केलेला नाही, असा आक्षेप ‘मुक्ता’चे सरचिटणीस प्राध्यापक वैभव नरवडे यांनी घेतला आहे.

या पाश्र्वभूमीवर यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापक  व कर्मचाऱ्यांचे सतरा महिने वेतन थकविल्यामुळे अध्यापकांनी कामबंद आंदोलन पुकारले असून त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसल्यानंतर जागे झालेल्या एआयसीटीईने आता महाराष्ट्रातील दहा अभियांत्रिकी महाविद्यालयांसह देशभरातील ५८ महाविद्यालयांना आपल्या अपीलीय समितीपुढे सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या सुनावणीनंतर या महाविद्यालयांवर प्रवेशबंदीची कारवाई केली जाणार का, तसेच एआयसीटीईच्या ‘प्रेसोस हँन्डबुक’ (नियमावली)अंतर्गत नियम ६ (१)अंतर्गत फौजदारी कारवाई करण्याची मागणी वैभव नरवडे यांनी केली आहे. ही अभियांत्रिकी महाविद्यालये एआयसीटीईचे नियम खुलेआम धाब्यावर बसवत असताना राज्याचे तंत्रशिक्षण संचालनालय आणि मुंबई विद्यापीठ बघ्याची भूमिका कशी घेऊ शकते असा सवालही नरवडे यांनी केला आहे.

First Published on April 19, 2018 3:58 am

Web Title: aicte issued notices to 58 engineering colleges across the country
Next Stories
1 तापभार वाढला; चंद्रपूर ४५ अंशांवर
2 मान्यता नसलेली वैद्यकीय महाविद्यालये बंद
3 ‘कचरानगरीत’ निवडणुकीसाठी बांधणी
Just Now!
X