25 February 2021

News Flash

अभियांत्रिकीत प्राध्यापक होण्यासाठी ‘एआयसीटीई’चे प्रशिक्षण बंधनकारक

एआयसीटीईशी देशात सध्या जवळपास तीन हजार अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.

| February 29, 2020 03:07 am

प्रतिनिधिक छायाचित्र

शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यावर भर

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक बनणे पूर्वीपेक्षा अधिक कठीण होणार आहे. देशातील सर्व अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्राध्यापक होण्यापूर्वी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) ६ महिन्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यावरच अभियांत्रिकी संस्थेत शिकवण्यास पात्र ठरणार आहे.

‘एआयसीटीई’चे सल्लागार डॉ. नीरज सक्सेना नागपुरात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

अभियांत्रिकी वगळता अन्य अभ्यासक्रमांना असणाऱ्या शिक्षकांच्या विविध पात्रता परीक्षा घेतल्या जातात. मात्र, अभियांत्रिकी प्राध्यापकांची पात्रता किंवा प्रशिक्षण देणारी कुठलीही यंत्रणाच नसल्याने एआयसीटीई नवीन शैक्षणिक सत्रातून शिक्षण प्रशिक्षण प्रक्रिया राबवणार आहे. एम.टेक., एम.एस्सी. केल्यावर विद्यार्थी थेट अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकवू लागले आहेत. यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत आहे. प्रशिक्षणाच्या अभावामुळे नवीन सत्रांत शिकवताना प्राध्यापकांना अनेकदा नवीन तंत्रज्ञान आणि अभ्यासक्रम समजत नाही. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस हे फुकट खर्च होतात, असे एआयसीटीईच्या निदर्शनास आले आहे. हा प्रकार रोखण्यासाठी आणि अभ्यासक्रमाची गुणवत्ता रोखण्यासाठी एआयसीटीईने प्रशिक्षणाची एक चौकट तयार केली आहे. संपूर्ण तयारीसह एआयसीटीई प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करीत आहे. ३० हजार प्राध्यापक या प्रशिक्षणात सामील होतील अशी अपेक्षा आहे. एआयसीटीईशी देशात सध्या जवळपास तीन हजार अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यातील लाखो प्राध्यापकांना याचा लाभ होईल असा विश्वास डॉ. सक्सेना यांनी व्यक्त केला.

विद्यापीठे निरुत्साही

रोजगाराची उपलब्धता नसल्याने अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडत आहेत. यासाठी एआयसीटीईने राज्यातील सर्व विद्यापीठांसाठी समान अभ्यासक्रमाचा कार्यक्रम आखून दिला आहे. यातून विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, विद्यापीठे नवीन अभ्यासक्रम लागू करण्याबाबत निरुत्साही असल्याची चिंता डॉ. सक्सेना व्यक्त केली.

असे असणार प्रशिक्षण..

अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा जगात पहिला प्रयोग एआयसीटीई करीत असल्याचे डॉ. सक्सेना यांनी सांगितले. यासाठी एआयसीटीईच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये नोंदणी करून शिक्षकांना सहा महिन्यांमध्ये हे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एआयसीटीईकडून संबंधित प्राध्यापकाला प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 3:07 am

Web Title: aicte training compulsory to become professor in engineering zws 70
Next Stories
1 ‘एसटी’ महामंडळाची आर्थिक स्थिती बिकट
2 गिरणी कामगारांसाठी म्हाडाची १ मार्चला सोडत
3 ‘आरटीई’मध्ये पूर्वप्राथमिकसाठी ६०० जागा
Just Now!
X