सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात युवासेना अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. करोना संकटाचा हाहाकार असताना महाराष्ट्र सरकारही करोनाचा पराभव करण्यासाठी प्रयत्नशी आहे. अशात महाराष्ट्र सरकारचे यश अनेकांना खुपते आहे. त्यामुळे सुशांत सिंह प्रकरणात माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबीयांवर नाहक चिखलफेक केली जाते आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

“सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूड हे मुंबईचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू जितका दुर्दैवी आहे तितकाच धक्कादायकही… मुंबई पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत. महाराष्ट्रातल्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत” असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

“मी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी संयमाने वागतोच आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये.” असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणेंचा आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसंच सुशांत सिंह प्रकरणात राज्य सरकार कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतं आहे असाही आरोप त्यांनी केला.

अमृता फडणवीस यांचं ट्विट

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विटही शिवसेनेला झोंबलं होतं. “सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर बोलताना अमृता फडणवीस यांनी “तपास ज्याप्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही” असं ट्विट अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर त्यांना शिवसेनेने प्रत्युत्तरही दिलं.

दरम्यान सुशांत सिंह प्रकरणात आरोप होऊ लागल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी हे सगळं गलिच्छ राजकारण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.