सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत एम्सने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम अहवालाबाबत माध्यमांनी दाखवलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांना तपासादरम्यान ज्या बाबी आढळून आल्या होत्या त्याच एम्सच्या डॉक्टरांना आढळल्या आहेत. यावरुन आमचा तपास योग्य होता यावर शिक्कामोर्तब होतं, असं मत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी व्यक्त केलं आहे.

परमबीर सिंग म्हणाले, “आमच्याकडे एम्स रुग्णालयाकडून अद्याप याबाबत कोणताही अधिकृत अहवाल आलेला नाही. मात्र, वृत्त वाहिन्यांना या अहवालाची माहिती झाली आहे. या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी आपल्या तपासात ज्या बाबी आढळल्या होत्या त्याच इथेही आढळून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांचा आणि कूपर रुग्णालयाचा तपास योग्य होता. या तपासावरुन आमच्यावर खूप आरोप झाले. मात्र, एम्सच्या अहवालानं हे सिद्ध केलं की आम्ही खरे आहोत.” इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.

“सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण मुंबई पोलिसांनी व्यवस्थित हाताळलं. यापूर्वीही मुंबई पोलिसांनी प्रत्येक प्रकरणं व्यवस्थित हाताळली आहेत. मुंबई पोलीसही अत्यंत प्रोफेशनल आहेत आमचा आमच्या तपासावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. सीबीआय सुद्धा एक प्रोफेशनल तपास यंत्रणा आहे,” असंही परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्याचबरोबर एम्सच्या डॉक्टरांच्या विशेष पॅनलकडे सुशांतच्या पोस्टमॉर्टम आणि व्हिसेरा रिपोर्टच्या पुनर्पडताळणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. फॉरेन्सिकच्या अहवालानुसार, सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या आहे.