प्रथम वर्गाच्या तिकिटापेक्षाही कमी दर 

गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या उपनगरी गाडीतून प्रवास करणे, हे मुंबईकरांसाठी मोठे आव्हानच असते. त्यात उन्हाची काहिली असेल तर बघायलाच नको. नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणारे, एखाद्या समारंभासाठी जाणारे यांना घामेजून चुरगळलेल्या कपडय़ांनिशी जाण्याची भीतीही भेडसावत असते. या सर्वावर मात करण्यासाठी वातानुकूलित उपनगरी गाडी पश्चिम रेल्वेवर येणार असल्याच्या वार्तची झुळूक मुंबईकरांना सुखावून गेली. मात्र या गाडीचे तिकीट किती असेल, या प्रश्नाची झळ अधेमधे चर्चेत बसत होती. तिला आता सुखद विराम मिळाला आहे. हा प्रवास खिशाला परवडणारा असेल, असे सांगण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेवर १ जानेवारी २०१८ पासून ही वातानुकूलित उपनगरी गाडी सेवेत रुजू होणार आहे. या गाडीचा प्रवास प्रवाशांच्या खिशाला परवडणारा असेलच, पण त्याबरोबर तिच्या तिकिटाचा दर पश्चिम रेल्वेवरील सध्याच्या उपनगरी गाडीच्या प्रथम वर्गाच्या तिकिटाहूनही कमी असेल. तसेच वातानुकूलित गाडीसाठी स्वतंत्र पासही उपलब्ध करून देण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वातानुकूलित  उपनगरी गाडीला प्रवासी मिळावेत यासाठी तिकीट दर सर्वसामान्यांना परवडेल असेच ठेवण्याचा पश्चिम रेल्वेचा मानस आहे. पश्चिम रेल्वेवरील प्रथम श्रेणीचे सर्वात कमी तिकीट ५० तर सर्वात जास्त तिकीट हे १७० रुपयांपर्यंत आहे. या वातानुकूलित उपनगरी गाडीचे वेळापत्रक आणि तिकीट दर निश्चित करण्यावर काम सुरू आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या फेऱ्या चालविण्यात येणार असून चर्चगेट ते विरारसह अंधेरी ते विरार अशी फेरीही चालविली जाणार आहे.

कमी गर्दीच्या वेळीही वातानुकूलित गाडीला किती प्रवासी मिळू शकतात याची चाचपणी घेण्यात येत असून त्यानंतरच रेल्वे मंडळाकडे कमी गर्दीच्या वेळीही ही गाडी चालविण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

वातानुकूलित उपनगरी गाडीचे तिकीट सध्याच्या उपनगरीय गाडीच्या प्रथम श्रेणीप्रमाणे ठेवले तर प्रवाशांना वातानुकूलित गाडीसाठी स्वतंत्र तिकीट काढण्याची आवश्यकता नाही. मात्र यावर अंतिम  निर्णय झालेला नाही. प्रवाशांच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेण्यात येईल.    – मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक