नवीन वर्षांत मध्य रेल्वेवर ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावर अंमलबजावणी

नवीन वर्षांत ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात पहिली वातानुकूलित लोकल दाखल झाली असून ट्रान्स हार्बरवर ती चालवण्याचे नियोजन आहे. या पहिल्या वातानुकूलित लोकलचे सारथ्य महिला मोटरमनच्या हाती देण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

लोकलची अधिक उंची आणि कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान असलेल्या उड्डाणपुलांच्या कमी उंचीमुळे मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकल चालवणे शक्य नव्हते. परंतु हा तांत्रिक तिढा सोडवल्यानंतर पहिली वातानुकूलित लोकल मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही चाचण्यानंतर जानेवारी २०२० पर्यंत ती धावण्याची शक्यता आहे. परंतु लोकल चालवण्याच्या नियोजनासंदर्भात त्याआधी प्रवासी संघटनांसोबत एक बैठक घेतल्यानंतर दुसरी बैठकही दोन दिवसांत होणार आहे. त्यात संघटनांची मते विचारात घेऊन लोकलच्या मार्गावर ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

देखभाल-दुरुस्तीसाठी तब्बल १०० कर्मचारी सेवेत

मध्य रेल्वेवर येणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या सेवेसाठी १०० कर्मचारी असणार आहेत. लोकल सेवेत आल्यानंतर त्यातील बिघाड तात्काळ दुरुस्त कसा करावा, त्याची देखभाल-दुरुस्ती कशी करावी इत्यादींचे प्रशिक्षण या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. चेन्नईतील रेल्वे कारखान्यात बनवलेल्या या लोकल गाडीसाठी ५० कोटींचा खर्च आला आहे. सध्या लोकलमध्ये सीसीटीव्ही नसून लवकरच सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसवणार आहेत.

एकूण सहा लोकल ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार पहिली लोकल दाखल झाली असून ती महिनाभरात सेवेत आणली जाणार आहे, तर दुसरी वातानुकूलित लोकलही मार्च २०२० पर्यंत येईल. उर्वरित चार लोकल डिसेंबर २०२० पर्यंत टप्प्याटप्प्यात दाखल होणार आहेत. याआधी वातानुकूलित लोकलच्या उंचीचा मुद्दा होता. पण येणाऱ्या सर्व लोकलची उंची कमी करण्यात आली असून त्यामुळे हार्बर, ट्रान्स हार्बरबरोबरच मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, खोपोली मार्गावरही लोकल धावणे शक्य आहे. ताफ्यात आलेली पहिल्या वातानुकूलित लोकलचा मार्ग अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. मात्र ही लोकल महिला मोटरमन चालवणार आहे.  – शलभ गोयल, विभागीय व्यवस्थापक