एअर इंडिया आणि गोंधळ असे जणू समीकरणच झाले आहे. याच गोंधळाचा फटका मुंबईहून अहमदाबादला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला. वैमानिक उपलब्ध नसल्यामुळे एअर इंडियाच्या मुंबई- अहमदाबाद विमानाला तब्बल सात तास उशीर झाला. या संतापजनक प्रकारामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या अडीचशे प्रवाशांना संपूर्ण रात्र मुंबई विमानतळावर जागून काढावी लागली.

एअर इंडियाने एआय ०३१ या विमानाने रात्री एक वाजून ३५ मिनिटांनी अमहदाबादसाठी उड्डाण करणे अपेक्षित होते. मात्र, वैमानिक उपलब्ध नसल्याने विमान उड्डाण करणार नाही, असे प्रवाशांना सांगण्यात आले. यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी विमानतळावरच एअर इंडियाचा ढिसाळ आणि नियोजन शून्य काराभाराविरुद्ध आंदोलन केले. काही प्रवासांनी विमानतळावरच धरणे धरले तर काहींनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तर काही प्रवाशांनी गेट अडवून ठेवले. या सर्व प्रकारामुळे विमानतळावर गोंधळ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रवासी आणि एअर इंडिया प्रशासनामध्ये सात तास सतत बाचबाची आणि वाद झाल्यानंतर रात्री दीड वाजताचे विमान सकाळी आठ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादच्या दिशेने झेपावले.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने इअर इंडियाच्या प्रवक्त्यांकडे या संदर्भात विचारणा केली असता, ‘फ्लाइट ड्युटी टाइम लिमेटेशन (म्हणजेच उड्डाण भरण्याचा प्रत्येक कर्मचाऱ्याचा मर्यादीत काळ असतो) आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने विमान उड्डणासाठी सात तास उशीर झाला’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, एअर इंडियाच्या या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना संपूर्ण रात्र विमानतळावर जागून काढावी लागली. मात्र, या दरम्यान एअर इंडिया प्रशासनाने प्रवाशांच्या राहण्याची अथवा जेवणाची सोय केली नसल्याचा आरोपही प्रवाशांनी केला. अडीचशे प्रवाशांची कोंडी करणाऱ्या या प्रकरणामध्ये नागरी हवाई उड्डाण मंत्रालय काही कारवाई करते का, हे येत्या काही दिवसातच समजू शकेल.