‘एअर इंडिया’च्या पहिल्या आणि बिझनेस वर्गातील प्रवाशांना विमानात देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थाची आधी चव घेऊन मगच ते निवडता येणार आहेत. या आठवडय़ाच्या अखेरीस एअर इंडिया ‘स्टार अलायन्स’शी करारबद्ध होत आहे.  
निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांवरील  खाद्यसेवा सुधारण्यासाठी विमान कंपनीने पुढाकार घेतला आहे. ‘ताजसॅट्स’ ही फ्लाइट कॅटर्स यात भागीदार असेल.
‘व्यक्ती तितक्या चवी’ या तत्त्वावर आधारित असलेल्या या संकल्पनेत विविध प्रकारच्या थाळ्या बनवल्या जातील. ‘द टेबल सेट-अप’ असे याचे नामकरण करण्यात आले आहे. या थाळ्यांची खाद्यपदार्थाची चव घेऊन ती निवडता येईल, असे ‘ताजसॅट्स’चे संचालक (अन्न) सतीश अरोरा यांनी स्पष्ट केले. २७ विमान कंपन्यांची मिळून बनलेल्या जागतिक विमानसेवेत ‘एअर इंडिया’चा पुढील आठवडय़ात औपचारिक समावेश केला जात आहे. व्यवसायवृद्धी आणि उत्तम संपर्क हे दोन उद्देश यामागे आहेत. याशिवाय देशांतर्गत विमानसेवेच्या आर्थिक वाढीचेही प्रमुख लक्ष्य राहील.
प्रवाशीहो तुमच्यासाठी..
*‘स्टार अलायन्स’च्या विमानसेवा जाळ्यातील २१,९८० ठिकाणांचा लाभ
*१९५ देशांतील १,३२८ विमानतळांवर दररोज विमानफेऱ्या
*प्रवाशांसाठी ४,३३८ विमानांचा समावेश
*वर्षांला सहा कोटी ४० लाख प्रवाशांची ने-आण
*एअर इंडियाच्या सेवेत दररोज आणखी ४०० विमाने, याशिवाय ३५ नव्या शहरांचा समावेश
*देशांतर्गत सेवेत ६२ शहरे