मुंबईमधील एयर इंडिया कंपनीच्या एका वैमानिकाचा सौदी अरेबियात संशयास्पद मृत्यू झाला आहे. रियाध या शहरातील एका हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला. कॅप्टन रित्विक तिवारी असे या वैमानिकाचे नाव आहे.

रियाध येथील हॉलिडे इन नावाच्या एका हॉटेलमधील हेल्थ क्लबच्या बाथरूममध्ये रित्विक बेशुद्ध अवस्थेत आढळला. बराच वेळ रित्विक बाहेर न आल्याने तेथील लोकांनी बाथरूमचा दरवाजा वाजवला. पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने पोलिसांना बोलवण्यात आले. अखेर पोलिसांनी दरवाजा उघडला, त्यावेळी तो जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला. त्यानंतर मेडिकल टीमला बोलावण्यात आले. मेडिकल टीमने रित्विकची तपासणी केल्यानंतर त्याला मृत करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विमानाचे कमांडर कॅप्टन रेणू मौले यांना प्रथम रित्विकची ओळख पटली. त्यानंतर एयर इंडियाच्या रियाध विभागाच्या व्यवस्थापकांनी रित्विकच्या वडिलांना ही बातमी दिली. तसेच, रियाध मधील भारतीय दूतावासालाही या संदर्भातील माहिती देण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बाथरूममध्ये रित्विकचा मृत्यू का झाला? याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. तसेच एयर इंडियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.