एअर इंडियाला विमान अपहरणाची धमकी देण्यात आली आहे. शनिवारी एअर इंडियाच्या मुंबई नियंत्रण कक्षाला विमान अपहरणाची धमकी देणारा फोन आला होता. मुंबईतल्या स्टेशन ड्युटी ऑफिसरने हा फोन उचलला. फोन करणाऱ्याने विमानाचे अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी दिली. या फोन कॉलनंतर बीसीएएसने सर्व विमान कंपन्या आणि सीआयएसएफला विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे. एअरपोर्ट सुरक्षा युनिट, एअरपोर्ट सुरक्षा गट आणि सर्व विमान कंपन्यांनी तात्काळ आठ उपायोजनांची अंमलबजावणी सुरु करावी असे बीसीएएसने आपल्या संदेशात म्हटले आहे. एपीएसयू आणि एएसजी सीआयएसएफचा भाग आहेत.

कार बॉम्ब हल्ल्याची शक्यता लक्षात घेता पार्किंग क्षेत्रात येणाऱ्या सर्व वाहनांची काटेकोर तपासणी, मुख्य प्रवेशद्वारावर प्रवाशी, स्टाफचे स्क्रीनिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागच्या आठवडयात पुलवामा येथे कार बॉम्बने घडवण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यामुळे संपूर्ण देशात संताप आणि तणावाचे वातावरण आहे. विमानतळाची सुरक्षा संभाळणारी यंत्रणा कुठलाही धोका पत्करायला तयार नाही.