ओरायन-२ जहाजावरील दुर्घटना; दोघे जण जखमी

मुंबईपासून १० किलोमीटर अंतरावर समुद्रात ओरायन-२ या जहाजावर वायुगळती झाल्याने जहाजावरील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून दोन जण अत्यवस्थ आहेत. ही  घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

अत्यवस्थ कर्मचाऱ्यांना बॉम्बे हॉस्पिटल येथे नेण्यात आले असून एकास अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. मंगेश भोसले(२७), जयंत चौधरी (२३), क्रिटिक कोच (२७) अशी मृतांची नावे असून जे. जे. रुग्णालयात त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने दिली.

तटरक्षक दलाच्या ‘मेरिटाइम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर’ (एमआरसीसी)ला शुक्रवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी समुद्रात उभ्या असलेल्या एम.व्ही. थॉर एंडेव्हर या सिंगापूरच्या जहाजाकडून एक आपत्कालीन संदेश आला. ओरायन-२ नावाच्या एका जहाजावर वायुगळती झाली असून या जहाजावरील पाच कर्मचारी बेशुद्धावस्थेत आढळून आल्याचे कळविण्यात आले. ‘एमआरसीसी’ने या घटनेची माहिती ओरायन-२ जहाजाच्या मालकाला कळवत हे जहाज किनाऱ्यावर आणण्यासाठी दुसरे जहाज पाठविण्याचे सूचित केले. तसेच, तटरक्षक दलाच्या सी-१५४ क्रमांकाचे जहाज तात्काळ घटनास्थळी रवाना होत रात्री १२ वाजून २० मिनिटांनी ओरायन-२ जहाजाजवळ पोहचले.

बाहेर काढण्यात आलेली व्यक्ती जहाजाची प्रमुख असून दाऊद इब्राहिम कुरे (५०) असे त्याचे नाव आहे; तर दुसऱ्या वाचवण्यात आलेल्या गणेश बिट्टा (४०) या कर्मचाऱ्याची परिस्थिती गंभीर होती. मुंबईच्या फेरी वार्फ बंदरावर किनारारक्षक दलाचे जहाज पोहचल्यावर सीआयएसएफ, मुंबई पोलीस, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी त्यांना तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये रवाना केले. यातील कुरे याची तब्येत स्थिर असून अन्य एकाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश

या जहाजात ९ कर्मचारी असून त्यातील पाच जण शुक्रवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी या टाकीत उतरले होते. सर्वात पहिला एक कर्मचारी उतरल्यावर तो आतील वायूमुळे बेशुद्ध पडला तर त्याला काढण्यासाठी उतरलेले अन्य ४ जणही नंतर बेशुद्ध पडले. यातील एकाला अन्य कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र तिघांना वाचविणे त्यांना शक्य झाले नाही, असे त्यांनी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.