मूळचे मुंबईकर असलेले आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) हवाई दल स्क्वाड्रनमधून प्रत्यक्ष हवाई दलात दाखल झालेले पी. एन. प्रधान यांना एअर मार्शल म्हणून पदोन्नती मिळाली असून मंगळवारी त्यांनी दक्षिणी हवाई कमांडचे वरिष्ठ अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. अशा प्रकारे एनसीसीच्या हवाई दल स्क्वाड्रनमधून आलेल्या अधिकाऱ्याला हवाई दलात मिळालेले हे आजवरचे सर्वोच्च पद आहे.
मूळचे मुंबईकर असलेल्या पी. एन. प्रधान यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेविअर्स महाविद्यालयात झाले. तिथेच एनसीसीच्या एअर स्क्वाड्रनमध्ये ते प्रथम क्रमांकाचे छात्रसैनिक होते. मंगळवारी थिरुवनंतपुरम येथे त्यांनी एअर मार्शलपदाची सूत्रे स्वीकारली. हवाई दलाच्या वाहतूक शाखेत १९८१ साली वैमानिक म्हणून ते दाखल झाले. सीमावर्ती भागात तसेच ईशान्य भारतात वैमानिक म्हणून काम करणे जिकिरीचे मानले जाते, अशा दुर्गम भागातही विमानचालनात त्यांनी प्रावीण्य संपादन केले आहे. उत्तम मान्यताप्राप्त प्रशिक्षक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. दुंडिगाल व येलहांका हवाई दल अकादमीमध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानादी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना घेऊन जाणाऱ्या भारतीय हवाई दलाचे ‘एअरफोर्स वन’ असा परिचय असलेल्या स्क्वाड्रनमध्ये त्यांनी दीर्घकाळ सेवा केली आहे. एम्ब्राएर-१३५, बोइंग जेट, हक्र्युलस, ग्लोब मास्टर आणि एमआय१७ व्ही ५च्या भारतीय हवाई दलातील समावेशात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अतिविशिष्ट सेवा पदक देऊन २०१४ साली गौरविण्यातही आले.