‘सफर’च्या नोंदणीनुसार हवेच्या प्रतवारीत घसरण

दिल्लीतील ‘अत्यंत वाईट’ स्थितीत असलेल्या हवेच्या प्रदूषणाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असतानाच आता मुंबईच्या हवेचे प्रदूषणही चर्चेचा विषय बनू लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या हवेची प्रतवारी २६३ इतकी झाली असून ती ‘वाईट’ अवस्थेत आहे.

pollution-chart

मुंबईतील विविध भागांतील हवेच्या गुणवत्तेची नोंद केंद्र सरकारच्या भू-विज्ञान मंत्रालयाच्या ‘सफर’ या संकेतस्थळावर घेतली जाते. त्यानुसार बोरिवली भाग वगळता वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, चेंबूर, मालाड, नवी मुंबई येथील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ दर्शवीत आहे. तर भांडुप, माझगाव, कुलाबा, वरळी तसेच संपूर्ण मुंबईच्या हवेची गुणवत्ता ‘वाईट’ दर्शविण्यात येत आहे. संपूर्ण दिल्लीच्या हवेची प्रतवारी ही ३९९ वर असून तिथेही हवेच्या प्रदूषणाची गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे मुंबईची ‘हवा’देखील दिल्लीच्या वाटेवर असल्याची स्थिती आहे. तापमानात बदल झाल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाल्याचे सफर संकेतस्थळाचे प्रमुख गुफ्रान बैग यांनी सांगितले आहे.