News Flash

सारासार : घर का भेदी

भारताबाबत विचार होतो तेव्हा घरातल्या प्रदूषणाचा केवळ चुलींशी संबंध लावला जातो.

पावसाळ्यातून ऑक्टोबर हीटमध्ये प्रवेश करतानाच आता पुन्हा एकदा शहरातील हवेच्या प्रदूषणाची चर्चा होण्यास सुरुवात होईल. पावसाळी जोरदार वाऱ्यांनी चार महिने मुंबईकरांना शुद्ध हवा पुरवली होती. त्याची जागा आता आपल्याच वाहनातून आणि बांधकामातून बाहेर पडणारे सूक्ष्म धूलीकण आणि वायू घेतील. मात्र या बाहेरच्या हवेची चर्चा करतानाच आपल्या स्वत:च्या घरातील प्रदूषणाचाही विचार करायला हवा. खिडकीतून आत येणाऱ्या हवेतून जेवढे प्रदूषण घरात शिरते तेवढेच किंबहुना कधी कधी त्यापेक्षाही अधिक प्रदूषण आपल्या घरातल्याच कामामुळे होते, हे माहिती आहे का तुम्हाला?

प्रदूषण हा जगभरात सध्या चच्रेचा विषय आहे. भारताबाबत विचार होतो तेव्हा घरातल्या प्रदूषणाचा केवळ चुलींशी संबंध लावला जातो. एका अर्थाने ते खरेही आहे. कारण लाकडे, पालापाचोळा, गोवऱ्या यातून पेटणाऱ्या चुलींमधून दरवर्षी प्रचंड प्रमाणात धूर बाहेर फेकला जातो. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरातही गरीब वस्त्यांमधून आजही या प्रकारचे प्रदूषण होते. मात्र आताचा मुद्दा थोडा वेगळा आहे. तो आहे, तुमच्या-आमच्या मध्यमवर्गीय घरांमधला. डास चावून मलेरिया, डेंग्यू होऊ नये यासाठी मच्छर अगरबत्ती वा कॉइल जाळल्या जातात. डास पळवण्यासाठी रात्रभर आपण ज्या धुरांडय़ात श्वास घेतो, त्यामुळे डासांपेक्षा आपलेच श्वास कोंडले जातात. पावसाळ्याच्या दिवसात सर्दी होत असल्याची तक्रार घेऊन जाणाऱ्यांना डॉक्टर आधी कोणती मच्छर अगरबत्ती लावता असे विचारतात, ते याचसाठी. अर्थात या मच्छर अगरबत्तीसोबत आपल्या देवासमोर लावलेली सुगंधी अगरबत्तीही हानिकारकच. त्यामुळे भावना दुखावण्याची गरज नाही. एवढीशी ती अगरबत्ती, त्याने सुवास येतो, प्रदूषण कसले होतेय.. असा विचार येईल. पण देवासमोर हात जोडताना नाकात गेलेला अगरबत्तीचा धूर आणि सिग्नलवर उभे असताना वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यात फारसा फरक नाही. सिग्नलवरचा धूर वाऱ्याच्या झुळकेने दूर जाईलही. मात्र घरातला अगरबत्तीचा धूर कोंडून राहिल्यास त्याचे परिणाम जास्त त्रासदायक होतात. देवासमोर जाळला जाणारा धूप किंवा त्यापेक्षाही नारळाच्या करवंटय़ा जाळून संध्याकाळी होणारी धुपारती यामुळे मानसिक शांती मिळत असेलही, पण हा जाळलेला धूप घरातल्या प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे.

धुपाचा धूर सहन न झाल्याने म्हणा किंवा आधुनिक बाजारपेठांमधील मोहाला बळी पडून म्हणा पण हल्ली अनेक घरात एअर फ्रेशनर्स म्हणजे हवा सुगंधी करणारे स्प्रे किंवा इलेक्ट्रॉनिक यंत्रे वापरली जातात. हवेत दरुगधी पसरते ती काही वायूंमुळे. या वायूंना झाकण्यासाठी त्यापेक्षाही अधिक तीव्रतेचे वायू या फ्रेशनर्समधून हवेत सोडले जातात. त्यामुळे हवा शुद्ध होत नाही तर आधीच प्रदूषित असलेल्या हवेत आणखी तीव्र वायूंची भर पडते.

दिवाळीआधी घर सजवण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांमुळे तर आपल्या श्वसनयंत्रणेवर व पुढे शरीरावर ताणच पडणार आहे. घर साफ करताना उडणाऱ्या धुळीपासून ते घराच्या इंटिरिअरच्या कामातून उडणाऱ्या सिमेंट-रेतीतून आपल्यासोबत शेजारपाजाऱ्यांच्या घरातील प्रदूषणाची टक्केवारी वाढते. खरे तर या कामांसाठी आता दिवाळीच्या मुहूर्ताचीही गरज लागत नाही. वर्षभरच आपल्या, शेजाऱ्यांच्या किंवा बाजूच्या इमारतींमधील कामे सुरू असतात. फíनचरच्या कामातून बाहेर पडणारा भुसा, फर्निचरवर लावले जाणारे रंग, घराच्या िभतींवरील रंग हे आपल्याला त्रासदायक ठरतात याचा अनुभव कधी ना कधी आला असणार. या रंगांमधून हवेत पटकन मिसळणाऱ्या घटकांत (व्होलाटाइल ऑरगॅनिक कम्पाऊंड- व्हीओसी) कार्बन, हायड्रोजन, फ्लुरीन, क्लोरीन, ब्रोमीन, सल्फर आणि नायट्रोजन असतात. याचा त्रास लगेच जाणवला नाही तर फुप्फुसांच्या क्षमतेवर ते दीर्घकालीन परिणाम करतात.

घरात अंथरली जाणारी कारपेट हीदेखील सर्दीपासून दमा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. या कारपेटमधून हवेत पसरणारे तंतू तसेच कारपेटखाली दमट भागात आलेल्या बुरशीचाही त्रास होतो. यात्यामुळे हल्ली अनेक घरांमधून कारपेटला रामरामही केलेला दिसतो.

बुरशीचा विषय निघालाय तर त्याबद्दलही बोलू या. आपल्याकडच्या अतिदमट हवेत कोणत्याही फळ, भाजीवर काही तासांत बुरशीचा हल्ला होतो. हे सूक्ष्म जीव आपल्या सभोवताली कायम असतात. आणि ते हवेतून आपल्या शरीरातही जातात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्यापासून घसा खवखवणे, सतत सर्दी होणे, त्वचेवर किंवा नाकात अ‍ॅलर्जी होण्यासारखे प्रकार घडतात. या सगळ्यात जर घरात कोणी धूम्रपान करत असेल तर विचारायची सोय नाही. बाहेरच्या उपाहारगृहांमध्ये सिगारेट ओढण्यावर बंदी घातल्याचा किती चांगला परिणाम झाला आहे, याची जर कल्पना असेल तर घरातल्या धूम्रफवारणीवर बंदी आणायला हरकत नाही.

या सगळ्यावर काय उपाय आहे, हा प्रश्न न विचारलेलाच बरा. कारण त्रास कशामुळे होतो ते माहिती असेल तर तो प्रकार टाळता कसा येईल किंवा कमी कसा करता येईल ते पाहायला हवे. घरातली हवा खेळती असेल तर प्रदूषणाचा त्रास कमी होतो. अन्यथा आपल्याकडे हवेतील प्रदूषण शोषून घेणाऱ्या उत्पादनांनी प्रवेश केलाच आहे. वर्षभरात ही बाजारपेठ तब्बल साठ टक्क्यांनी वाढली आहे आणि दिल्ली, मुंबईसारख्या प्रदूषण असलेल्या आणि या वस्तू विकत घेण्यासाठी खिशात पसा खुळखुळणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक कंपन्या उत्पादनांसह तयार आहेत. घरातले प्रदूषण रोखण्यासाठी आपण प्रयत्न करायचे की कंपन्यांची उत्पादने विकत घेऊन बाजारपेठेला हातभार लावायचा ते ज्याचे त्याने ठरवावे.

prajakta.kasale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 2:43 am

Web Title: air pollution issue in mumbai
Next Stories
1 सेवाव्रत लव्हाळीची : ‘आदर्श’ आश्रमशाळा  
2 Uddhav Thackeray: हिंमत असेल तर युती तोडा!
3 केबल सेवा स्वस्त : १३० रुपयांत १०० वाहिन्या देण्याचा प्रस्ताव
Just Now!
X