टाळेबंदीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता वाढ; घातक घटकांचे प्रमाण कमी

मुंबई : संपूर्ण टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक ठिकाणी हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण ७० ते ८७ टक्कय़ांनी कमी झाले. तर हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात कमालीची सुधारणा झाली असून अनेक दिवस तो समाधानकारक पातळीवर राहिला आहे.

देशभरात संपूर्ण टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच राज्यात अनेक प्रतिबंधित उपाय १७ मार्चपासून लागू करण्यात आले होते. तेव्हापासूनच मुंबईच्या हवेतील प्रदूषित घटकांचे प्रमाण कमी होऊन गुणवत्ता निर्देशांकात सुधारण होऊ लागली. या  काळातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शहरातील नऊ केंद्रांवरील हवेतील घटकांच्या आकडेवारीचे तुलनात्मक विश्लेषण ‘वातावरण’ या संस्थेने केले आहे. त्यामध्ये पीएम २.५ आणि नायट्रोजन ऑक्साइडच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याचे यातून स्पष्ट होते.

वाहतूक, कोळसा आणि तेल यासारख्या जीवाश्म इंधनांच्या ज्वलनामुळे नायट्रोजन मोनोऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. यांचा श्वसन प्रक्रियेवर घातक परिणाम होतो. प्रतिबंध लागू केल्यापासून १७ मार्च ते १ एप्रिल या काळात संपूर्ण मुंबईमध्ये नायट्रोजन डायऑक्साइडच्या प्रमाणात ८७ टक्कय़ांनी घट झाली आहे. सर्वाधिक घट ही वांद्रे ८१ टक्के आणि कुर्ला परिसरात ९२ टक्के झाली आहे. त्याचबरोबर पीएम २.५ या घातक घटकाचे प्रमाण ७२ टक्कय़ांनी कमी झाले. तर पीएम १० मध्ये ६८.९ टक्के, कार्बन मोनॉक्साइडमध्ये २४.१ टक्कय़ांची घट झाली.

‘हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कोणत्या उपायांची गरज आहे, हे या टाळेबंदीच्या अनुषंगाने दिसून येत असल्याचे, वातावरण संस्थेचे संस्थापक भगवान केसभट यांनी सांगितले. दीर्घकालीन उपाययोजना करताना या नोंदीचा उपयोग होईल असे त्यांनी नमूद केले.

हवेचा गुणवत्ता निर्देशांक

१७ मार्चला मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावर होता. नंतरच्या दोन दिवसात त्यामध्ये सुधारणा होऊन तो मध्यम स्तरावर आला. जनता संचारबंदीच्या दिवशी २२ मार्चला हवेतील प्रदूषित घटकाचे प्रमाण केवळ ६१ म्हणजेच उत्तम या पातळीवर होते. १७ मार्च ते १ एप्रिल या काळातील ही सर्वात उत्तम परिस्थिती आहे. नंतर संपूर्ण टाळेबंदीच्या काळात प्रदूषित घटकात थोडय़ाफार प्रमाणात वाढ होत राहिली. सध्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक पातळीवर आहे.