आकाशातून मुंबईचे विहंगम दृश्य याचि देही याचि डोळा टिपण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. ‘जागतिक पर्यटन दिना’च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र पर्यटन महामंडळा’ने हवाई पर्यटनाची पर्वणी लोकांसाठी खुली केली आहे. ‘हेली टुरिझम’ नावाने सुरू केलेल्या या संकल्पनेंतर्गत पर्यटकांना हेलिकॉप्टरमध्ये बसून समुद्र, उंचच उंच इमारती, गिरण्यांची धुराडे अशा लांबवर पसरलेल्या मुंबईचे हवाई दर्शन घेता येणार आहे. आकाशातून मुंबईचे नेत्रदीपक दृश्य पाहत असताना दिसणारी क्षितीजरेषा पाहणे हा एक सुखद अनुभव आहे. या शहरात अनेक अशा सुंदर जागा आहेत ज्या वरून पाहणेही तितकेच प्रेक्षणीय आहे. मुंबईत येणाऱ्या देशी आणि विदेशी पर्यटकांचे वाढते प्रमाण पाहता मुंबईचे हवाई दर्शन ही कल्पना नक्कीच पर्यटकांना आकर्षित करेल, असा विश्वास एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुटिया यांनी व्यक्त केला. ‘हेली टुरिझम’साठी हिमालयीन पर्वतरांगांमध्ये हवाई पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या ‘गिरीसन्स एअरवेज’शी एमटीडीसीने हातमिळवणी केली आहे. ‘हेली टुरिझम’साठी जुहू विमानतळावरून दर रविवारी हेलिकॉप्टर्स सोडण्यात येणार असून पंधरा मिनिटांच्या मुंबई हवाई दर्शनासाठी पर्यटकांना जवळपास चार हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
‘हेली टुरिझम’ ही संकल्पना आपल्या देशात पहिल्यांदाच मुंबईत सुरू करण्यात आली असल्याचे नैनुटिया यांनी सांगितले. सध्या मुंबईची हवाई टूर घडवल्यानंतर हळूहळू एलिफंटा लेणी, अजंठा-वेरूळ लेणी आणि शिर्डी येथेही हवाई टूर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ‘एमटीडीसी’ने दिली आहे.