देशात हवाईउद्योगाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या जे. आर. डी. टाटा यांच्या छायाचित्राने सजलेले ‘एअर एशिया इंडिया’ कंपनीचे चौथे विमान ताफ्यात दाखल झाले आहे. जे. आर. डी. टाटांनी १५ ऑक्टोबर १९३२ मध्ये  ‘टाटा एअरलाईन्स’ची आणि पर्यायाने देशात पहिल्यांदाच हवाई सेवा देण्यास सुरूवात केली होती. त्यांच्या कर्तृत्वाला सलामी म्हणून ‘एअर एशिया’च्या चौथ्या विमानावर त्यांची छायाचित्रे छापण्यात आली असून विमानालाही ‘द पायोनियर’ असे नाव देण्यात आले आहे. mu02हैद्राबादमधील जीएमआर एरो टेक्निक हवाई तळावर ‘एअर एशिया इंडिया’ कंपनीच्या चौथ्या विमानाचे अनावरण करण्यात आले. ‘एअर एशिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिट्टु शांडिल्य, मुख्य कार्यकारी अध्यक्ष टोनी फर्नाडिस आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या प्रमुख उपस्थितीत चौथ्या विमानाचे अनावरण करण्यात आले. ‘जे. आर. डी. टाटा हे दूरदृष्टीने विचार करणारे होते. जगातील लोक ज्या हवाई सेवेचा आनंद घेत आहेत त्याचा माझ्या देशातील लोकांनाही उपभोग घेता आला पाहिजे या विचाराने त्यांनी देशात हवाई सेवेचा पाया रचला. ‘एअर एशिया’ने त्यांचा ज्या पध्दतीने सन्मान केला आहे त्याबद्दल मला आनंद वाटतो’, अशा शब्दांत रतन टाटा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर ‘एअर एशिया’च्या प्रगतीचा आनंद हा त्या व्यक्तिला आठवून साजरा करायचा होता ज्यांच्याशिवाय देशात हवाई उड्डाणाचे स्वप्न साकारणे शक्य नव्हते. हवाई उद्योगाला वेळोवेळी दिशा देण्याचे काम टाटा समूहाने के ले आहे आणि आज ‘एअर एशिया’लाही त्यांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे. त्यामुळे जे. आर. डी. टाटांनी केलेल्या किमयेची आठवण क रून देणारे ‘एअर एशिया’चे चौथे विमान देताना आम्हाला खूप अभिमान वाटतो, असे सांगून मिट्टु शांडिल्य यांनी प्रत्येक भारतीयाला परवडेल अशी हवाई सेवा देण्याच्या दृष्टीने ‘एअर एशिया’ लवकरच पाऊल उचलेल, असे आश्वासनही दिले.