प्रवाशांचे हाल, शेकडो उड्डाणे रद्द

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टय़ा देखभाल-दुरुस्तीसाठी आठवडय़ातील तीन दिवस सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. डागडुजीचे काम गुरुवारपासून सुरू करण्यात आले असून त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी २३० विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले होते, तर ३३ टक्के विमानांना उशीर झाला. अशा परिस्थितीत विमानांची कमतरता आणि वर्दळीच्या मार्गावरील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विमान कंपन्यांनी तिकीट दर दुपटीपेक्षा जास्त वाढवल्याचे समजते.

डागडुजीसाठी विमानतळावरील दोन्ही धावपट्टय़ा २८ फेब्रुवारीपर्यंत मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी प्रमुख धावपट्टीवरून तासाला ५० विमाने उड्डाण करतात आणि उतरतात. अन्य धावपट्टीवरून तासाला ३५ विमानांची ये-जा होते. दोन्ही धावपट्टय़ा गुरुवारी सहा तास बंद राहिल्याने वर्दळीच्या मार्गावरील २३० विमानसेवा रद्द करण्यात आल्या.