विमानतळासारख्या डायनिंग टेबल, सोफा, ग्रंथालय, कॅफे आदींचा समावेश असलेल्या परिपूर्ण अशा आरामदायी प्रतीक्षालयांची सुविधा आता मेल-एक्स्प्रेस प्रवाशांनाही उपलब्ध झाली आहे. हे प्रतीक्षालय सीएसएमटीतील मेल-एक्स्प्रेस टर्मिनसवर प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. प्रतीक्षालयात एका तासासाठी १० रुपये दर आकारणी निश्चित केली आहे. जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी त्याचे दर मध्य रेल्वेकडून कमी ठेवण्यात आले आहे.

सध्या मध्य रेल्वेवर मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठी असलेल्या प्रतीक्षालय, विश्रामकक्षात सुविधांची वानवा आहे. त्यांचे दरही काहीसे जास्त आहेत. याशिवाय ते टर्मिनसवरील फलाटांपासून काहीसे दूर आहेत. त्यामुळे १४, १५, १६, १७ आणि १८ क्रमांकाच्या फलाटाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच वातानुकूलित प्रतीक्षालय बनवण्याची योजना होती आणि ती अमलात आणली गेली. हे प्रतीक्षालय प्रवाशांसाठी खुले करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर त्याची उभारणी करण्यात आली आहे. याला प्रतिसाद चांगला मिळाला तर लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण येथेही प्रतीक्षालय उभारण्याचा विचार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

सॅनिटाइज करण्यासाठी दर

सीएसएमटी स्थानकात मेल-एक्स्प्रेस प्रवाशांच्या सामानाला कव्हर करणे आणि त्यांना सॅनिटाइज करण्याचीही व्यवस्था सुरू केली आहे. त्यासाठीही दर आहेत.

सुविधा काय?

* प्रतीक्षालयात सोफा, डायनिंग टेबल, प्रसाधनगृह, क्लॉक रुम, लायब्ररी, लॅपटॉपसह बसण्याची व्यवस्था, चार्जिग पॉइंट, खानपान सेवा, पर्यटन साधने यांसह अन्य सुविधा उपलब्ध आहेत.

* या प्रतीक्षालयात एक तासासाठी १० रुपये दर आकारणी निश्चित केली आहे. ५ ते १२ वयोगटांतील मुलांसाठी प्रत्येक तासाला पाच रुपये असा दर आहे.

* पाच वर्षांखालील मुलांना मात्र मोफत प्रवेश आहे. खानपान सेवेसाठी मात्र पैसे अदा करावे लागतील.

प्रतीक्षालयात येणाऱ्या प्रवाशांकडून सुरक्षा ठेव (डिपॉझिट) म्हणून ५० रुपये शुल्क आकारण्यात येतील. प्रतीक्षालय सोडताना ग्राहकांना हा परतावा दिला जाईल.

* प्रवाशांना मेल-एक्स्प्रेस गाडय़ांची माहिती मिळावी म्हणून एलसीडी स्क्रीन बसवण्यात आले असून गाडय़ांची माहिती देण्यासाठी उद्घोषणा व्यवस्थाही केली आहे.