महिन्याभराचा सराव आणि दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या पुरस्कार सोहळ्याकरिता मॉरिशसला रवाना होण्यासाठी बुधवारी पहाटे मुंबई विमानतळावर पोहोचलेल्या १२२ मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांना ऐन वेळी पुरस्कार रद्द झाल्याचा निरोप देण्यात आला. हा पुरस्कार ऐन वेळी का रद्द झाला? याचे कुठलेही स्पष्ट कारण देण्यास असमर्थ ठरलेल्या आयोजकांनी हात वर केल्यामुळे पहिल्यावहिल्या ‘अजिंक्यतारा पुरस्कार’ सोहळ्यासाठी मॉरिशसला निघालेल्या मंडळींना चरफडत घरी परतावे लागले.
मराठी कलाकारांना गृहीत धरून अशी अपमानास्पद वागणूक याआधी कधीच दिली गेली नव्हती, अशा शब्दांत कलाकारांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या ‘सुपरव्हिस्टा एन्टरटेन्मेट कंपनी’ने काही कारणांमुळे सोहळा पुढे ढकलावा लागला असल्याची माहिती रात्री उशिरा निवेदनाद्वारे दिली.
या वर्षी पहिल्यांदाच होणाऱ्या ‘अिजक्यतारा पुरस्कार’ सोहळ्यासाठी मराठी चित्रपट कलाकारांना निमंत्रित करण्यात आले होते. हा नवा सोहळा मॉरिशसमध्ये दणक्यात व्हावा, यासाठी कार्यक्रमांची आखणी क रण्यात आली होती. गेले महिनाभर आपले १२-१२ तासांचे चित्रीकरण सांभाळून या सोहळ्यासाठी सराव करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर, पूजा सावंत, मानसी नाईक, अभिजीत केळकर अशा आघाडीच्या कलाकारांचा समावेश होता.  २१ ते २३ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यासाठी बुधवारी सकाळच्या विमानाने निघणाऱ्या कलाकारांना विमानतळावर पोहोचल्यानंतर सोहळाच रद्द झाल्याचा निरोप देण्यात आला. हा सोहळा असा अचानक रद्द का झाला? याचे कुठलेही कारण आयोजकांनी दिले नाही. त्यामुळे कलाकारांच्या संतापात अधिकच भर पडली. पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी एकत्र आलेल्या भागीदारांपैकी एकाने ऐन वेळी माघार घेतल्याने हा पुरस्कार रद्द झाल्याची कुजबुज सुरू आहे. मात्र, आयोजकांपैकी एक असलेल्या शिवाजी गणेशन यांनी आम्ही सगळे भागीदार एकत्र आहोत, असा दावा केला आहे.
हा सोहळा रद्द होण्याचे नेमके कारण आयोजकांनी अजूनही गुलदस्त्यातच ठेवले आहे. हा सोहळा काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलावा लागला असून यात सहभागी असलेल्या ‘सिनेयुग’ कंपनीसह सर्व भागीदार एकत्र आहेत आणि नव्याने या सोहळ्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

अचानक आलेल्या आर्थिक अडचणींमुळे सोहळा रद्द होऊ शकतो. मात्र, असे काही कारण पुढे येऊ शकते याची पुरेपूर कल्पना आयोजकांना असली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी दुसरा पर्याय तयार ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. आजवर एवढे कार्यक्रम परदेशात झाले. मात्र, अशा प्रकारे मराठी कलाकारांचा अपमान कधीच झाला नव्हता.
– विजय पाटकर, अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ