News Flash

अजित की सुप्रिया हा पवारांपुढील पेच!

सुप्रियाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आमच्यावर अद्याप वेळ आलेली नाही, या शरद पवार यांच्या राहुल गांधी यांच्या निवडीवरील प्रतिक्रियेची काँग्रेसने सोमवारी परतफेड केली. आमचे सारे काही

| January 22, 2013 03:35 am

काँग्रेसचे प्रत्युत्तर
सुप्रियाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आमच्यावर अद्याप वेळ आलेली नाही, या शरद पवार यांच्या राहुल गांधी यांच्या निवडीवरील प्रतिक्रियेची काँग्रेसने सोमवारी परतफेड केली. आमचे सारे काही ठीक आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित की सुप्रियाकडे सोपवावे हा पवारांपुढेच मोठा पेच आहे, अशा शब्दांत काँग्रेसने पवारांची टीका टोलवली.  
राहुल गांधी यांची निवड झाल्यावर पवारांनी काँग्रेसची खिल्ली उडविली होती. पवारांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा वयाने लहान असलेल्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करणे पवार यांना शक्य होणार नाही हे स्वाभाविकच आहे. राहुल गांधी यांच्यावर यापूर्वीही पवार यांनी अनेकदा टीकाटिप्पणी केली होती. राहुलच्या निवडीची खिल्ली उडविताना पवार यांनी सुप्रियाचा उल्लेख केला होता. नेमका सुप्रियाचाच का उल्लेख केला, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रश्न पडला आहे. त्यावरच नेमके काँग्रेसने बोट ठेवले. राहुल गांधी यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. पक्षाचे ते पंतप्रधानपदाचे दावेदार असतील हे निश्चित आहे. मात्र, राष्ट्रवादीत तसे दिसत नाही. राष्ट्रवादीची सूत्रे अजित पवार की सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवायची हाच शरद पवार यांच्यापुढे मोठा पेच आहे. त्यातूनच पवार यांनी बहुधा सुप्रियाचा उल्लेख करून, तसे संकेत दिले असावेत, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर यूपीए-३ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आल्यास शरद पवार कोणती भूमिका स्वीकारतील, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही हे पवार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. तशी परिस्थिती निर्माण झालीच तर सुप्रियाकडे केंद्रात महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जाते.
राहुलकडे पक्षात महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या पवार यांचा योग्य मानसन्मान राखतील. यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी राष्ट्रवादी बरोबर राहील अशीच चिन्हे आहेत. लोकसभा निकालावरच राष्ट्रवादीची पुढील दिशा स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:35 am

Web Title: ajit or supriya confusion in front of shard pawar
Next Stories
1 ‘महानिर्मिती’च्या क्षमताविस्ताराचा संकोच!
2 पुरावे नष्ट होण्याच्या भीतीने जामीन नाकारणे अयोग्य
3 एमएमआरडीएच्या कारभारावर श्वेतपत्रिका
Just Now!
X