कोकण जलसिंचन महामंडळाच्या कोंढाणे प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असलेल्या चौकशीसाठी सुनील तटकरे यांच्यापाठोपाठ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बुधवारी मुंबई कार्यालयात हजर झाले. पाच तास ही चौकशी चालली. आवश्यकता भासल्यास या दोन्ही नेत्यांना एकाच वेळी चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे.

एखाद्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी पवार कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजर झाली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे एसीबीच्या विशेष पथकामार्फत घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. समाधान होईपर्यंत आपण चौकशीला सामोरे जाऊ, असेही पवार यांनी यावेळी विशेष पथकातील अधिकाऱ्यांना सांगितल्याचे कळते. विशेष पथकाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तरे दिली आहेत, असेही पवार यांनी सांगितले.