राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी नऊ वाजल्यापासून विविध विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या दरम्यान भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यावरून चांगली चर्चा रंगली होती. याबाबत अजित पवार यांना पत्रकार परिषदेत विचारले असता ते म्हणाले की, मला सर्व पक्षातील आमदार कामानिमित्त भेटत असतात. त्यानुसार आज प्रसाद लाड सार्वजनिक कामानिमित्त भेटले असून उगाच त्याचा काही वेगळा अर्थ काढू नका. असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

यावेळी अजित पवार म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या दोन्ही शहरात मेट्रो लवकरच धावणार आहे. प्रत्येकाला आपल्या भागात मेट्रो आली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर मेट्रोचे जाळे पसरविण्यात येत आहे. त्याच भाग म्हणून पिंपरी चिंचवड येथील नागरिकांनी पुणे मेट्रो नावात बदल करून पुणे पिंपरी चिंचवड महामेट्रो अशी मागणी केली होती. ही मागणी मान्य केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे ते मुंबई हायपरलूप बाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हायपरलूप जगात कुठे ही झाली नाही. जगात कुठं 10 किमी तर होऊ द्या. जर तिकडे सक्सेसफुल झाली. तर आपल्याकडे चाचणी घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांचा आभारी : अजित पवार

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याने, त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली. त्यामुळे त्यांच्या जागी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे संजय दौंड यांनी अर्ज दाखल केला होता. तर त्यांच्या विरोधात भाजपानेहीउमेदवार दिला होता. मात्र आज भाजपाकडून देण्यात आलेल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांचा आभारही अजित पवार यांनी मानले आहेत.