News Flash

“..तर उद्या पुन्हा माझी ब्रेकिंग न्यूज होईल!” मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर अजितदादांनी हाणला टोला!

मोफत लसीकरणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय!

संग्रहित छायाचित्र

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच परिचित आहे. अनेकदा जाहीरपणे देखील अजितदादा मनातलं थेट बोलून मोकळे होतात. काही वेळा त्यांना अशी वक्तव्य अंगलट देखील आलेली आहेत. मात्र, तरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामध्ये अजिबात फरक पडलेला नाही. माध्यम प्रतिनिधींसोबत अनेकदा अजित पवार अशाच प्रकारे कधी थेट तर कधी विनोदी शैलीमध्ये मनात आहे ते बोलत असल्याचा अनेकांना अनुभव आहे. मंगळवारी राज्यातील प्रस्तावित मोफत लसीकरणाविषयी बोलताना देखील अजित पवारांनी आपल्या वक्तव्यांचा कसा विपर्यास होऊ शकतो आणि त्याचसाठी कसा संयम ठेवायला हवा, हेच जणूकाही स्पष्ट केलं!

नेमकं झालं काय?

राज्यात सध्या १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याच्या मुद्द्याची चर्चा सुरू आहे. आधी खुद्द अजित पवारांनीच लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्याची घोषणा पुण्यात केली होती. त्यानंतर काही तासांत त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय झाल्याचं जाहीर करून टाकलं. यावरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो न होतो, तोच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील लगोलग मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर ट्वीट केलं. पण काही वेळातच चूक लक्षात आल्यामुळे त्यांनी हे ट्वीट मागे घेतलं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं मोफत लसीकरण हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

या मुद्द्यावरून जेव्हा अजित पवारांना मंगळवारी विचारणा केली गेली, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे “मोफत लसीकरणाविषयी अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, असं सांगितलं. “ज्या निर्णयामुळे राज्यावर आर्थिक भार पडू शकतो, त्यावर निर्णय महाविकासआघाडीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्रीच घेऊ शकतात. बाकीच्यांनी त्यामध्ये समंजस भूमिका घ्यायला हवी. अशी वक्तव्य इतरांनी टाळलेलं चांगलं”, असं म्हणत अजित पवारांनी मोफत लसीकरणाविषयी वक्तव्य करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे समजच दिल्याचं बोललं जात आहे.

२४ तास प्रतीक्षा करा!

दरम्यान, उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोफत लसीकरणावर चर्चा होणार असून तेव्हाच निर्णय होईल, असं अजित पवारांनी सांगितल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा खोदून खोदून काय निर्णय होऊ शकतो, असं विचारलं असता अजित पवारांनी त्यावरून प्रतिनिधींना चांगलाच टोला हाणला. “आत्ता मी काही बोललो आणि उद्या तिकडे मंत्रिमंडळ बैठकीत सगळ्यांच्या चर्चेत काही वेगळा प्रस्ताव मंजूर झाला तर उद्या पुन्हा माझी ब्रेकिंग न्यूज होईल. बघा अजित पवार हे म्हणाले होते आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा उद्या काय तो निर्णय होईल. २४ तास प्रतीक्षा करा”, असं अजित पवार म्हणाले.

“मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील”, अजित पवारांनी केलं स्पष्ट!

सगळ्यांनीच नियमांचं पालन करा!

रेमडेसिविरचं परस्पर खासगीरीत्या वाटप सुरू असल्याची काही प्रकरणं गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली होती. त्यावर अजित पवारांनी टिप्पणी केली आहे. “औरंगाबाद खंडपीठाने रेमडेसिविर खासगीरीत्या वाटण्यावर आक्षेप घेऊन तो सर्व साठा जमा करायला सांगितला आहे. सर्व गोष्टींची तपासणी करूनच रेमडेसिविर देता येतात. पवार साहेब देखील म्हणायचे जिल्हाधिकाऱ्यांकडे तो कोटा द्या. प्रशासनाकडे कोटा द्यायला हवा आणि त्यानंतर तिथून लोकांना वाटप व्हायला हवं. काहींचे विमानात बसलेले बॉक्ससोबतचे फोटो मी पाहिले. मला वाटतं की फार अतिरेक कुणी करू नये. सत्ताधारी किंवा विरोधक प्रत्येकानेच नियमांचं तंतोतंत पालन करूनच पुढचे निर्णय घ्यायला हवेत”, असं अजित पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 1:25 pm

Web Title: ajit pawar confirms free vaccination in maharashtar decision in cabinate meeting pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 “१ मे पासूनच्या लसीकरणासाठी मुंबई मनपा सज्ज, मात्र …”
2 “मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील”, अजित पवारांनी केलं स्पष्ट!
3 फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांकडून समन्स, उद्या हजर राहण्याचे आदेश
Just Now!
X