उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाहीत असा सवाल विचारत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. योगी आदित्यनाथ हे पंधरा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तुम्ही तर गेल्या अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री आहात मग तुम्हाला कर्जमाफी देण्यास काय अडचण आहे असा सवाल अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला.  सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्रितरित्या कर्जमाफी संदर्भात पत्रकार परिषद घेतली. राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम, सुनील तटकरे हे नेते या पत्रकार परिषदेला हजर होते.  

उत्तर प्रदेशमध्ये ज्या प्रमाणे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्यात आले आहे त्या प्रमाणे महाराष्ट्रात कर्जमाफी नको असे असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. राज्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी दिली पाहिजे असे ते म्हणाले. पाच एकरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी असावी असे त्यांनी म्हटले. सरकार हे शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाही असे ते म्हणाले. शेतकऱ्यांशी या सरकारला काही सोयरसुतक नसल्याची टीका अजित पवारांनी केली.  

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही पॅटर्नचा अभ्यास करण्याची काही आवश्यकता नाही असे राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव तुम्हाला हवी. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही त्यामुळे त्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे असे ते म्हणाले. जर योगी आदित्यनाथांना शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येऊ शकते तर फडणवीसांना का देत येत नाही असा सवाल सुनील तटकरेंनी विचारला.

कर्जमाफीच्या मुद्दावरुन विरोधक गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. विधानसभेमध्ये गोंधळ घातल्यामुळे १९ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. हे सर्व विरोधक कर्जमाफीसाठी घोषणाबाजी करत होते. त्यापैकी ९ जणांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. कर्जमाफी मिळावी म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांनी संघर्ष यात्रा काढली होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर सत्ताधाऱ्यांचे जीणे हराम करू असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हटले होते.