विधान परिषदेत सर्वाधिक सदस्यसंख्या राष्ट्रवादीची आहे त्यामुळे सभापतीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क होता आणि हा हक्क मिळवण्यासाठी भाजपचा पाठिंबा घेतल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी सोमवारी व्यक्त केले. तसेच शिवाजीराव देखमुखांनी राजीनामा दिला असता तर, अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले नसते असेही ते पुढे म्हणाले. भाजपच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी-भाजप एकत्र आल्याची चर्चा चूकीची असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. सभापतीपदाचा विषय वेगळा आणि राजकीय भूमिकेचा विषय वेगळा आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
देशमुखांविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर, भाजपची राष्ट्रवादीला साथ
दरम्यान, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने मांडलेला अविश्वासाचा प्रस्ताव सोमवारी भाजपच्या पाठिंब्यामुळे ४५ विरुद्ध २२ मतांनी स्वीकारण्यात आला. या प्रस्तावाच्या विरोधात भूमिका मांडणाऱया शिवसेनेने मतदानावेळी सभात्याग केला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे शिवाजीराव देशमुख यांना सभापतीपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.