कॉ. गोविंद पानसरे हत्या खटल्याप्रकरणी अजित पवार यांचा राज्य सरकारवर आरोप
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनच्या समीर गायकवाड याला संशयित म्हणून अटक झाली आहे. त्याला सोडवण्यासाठी ४० वकिलांची फौज न्यायालयात आली होती, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यामागे कोणाचा मेंदू कार्यरत आहे, याचा शोध घ्यावा, असे सांगत राज्य सरकारवर शरसंधान साधले.
अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त वाशी येथील माथाडी कामगार मेळाव्यात अजित पवार बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार नरेंद्र पाटील, आमदार शंशिकात शिंदे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, समीर गायकवाडला सोडविण्यासाठी वकिलांची फौज कोणी उभी केली, याची माहिती जनतेसमोर यायला हवी. या प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी सरकारच्या मदतीने ही फौज उभी राहिल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. मोदी सरकार फक्त निवडणूक काळात पैसे वाटण्याची घोषणा करते, इतर वेळी मात्र लक्ष देत नाही.
बिहारमध्ये निवडणुका असल्याने सव्वा लाख कोटी रुपयांची मदत घोषित केली, मात्र राज्यात दुष्काळपीडित शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही, अशी टीका करत मोदी सभेमधून किती आर्थिक मदत पाहिजे, असा लिलाव मांडत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
यांत्रिकीकरण वाढत असल्याने भविष्यात माथाडी कामगारांना आधुनिकीकरणाला सामारे जावे लागणार असून, पुढील पिढीस उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा सल्ला पवार यांनी दिला. मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. याच वेळी संघाचे धुरीण आरक्षणाविरोधात वक्तव्य करीत असल्याता आरोपही पवार यांनी केला.

नव्या सरकारला विकासकामांसाठी अवधी हवा होता. त्यामुळे टीकेचा हल्ला रोखण्यात आला होता; परंतु आता त्यांना वर्ष पूर्ण झाले आहे. केंद्रातील सरकारला दीड वर्ष झाले आहे. या दरम्यान सरकारचे कामकाज समाधानकारक नसल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सरकारला जाब विचारला जाईल, आता आम्ही गप्प बसणार नाही. – अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री