महाराष्ट्र स्थावर संपदा नियामकप्राधिकरणाच्या(महारेरा)अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार आणि  माजी मुख्य सचिव  अजोय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष गौतम चटर्जी  यांची मुदत संपल्याने गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपद रिक्त होते. बांधकाम उद्योगावर नियंत्रण ठेवणाऱ्या या महत्वाच्या पदावर वर्णी लागावी यासाठी अनेक सनदी अधिकारी प्रयत्नशील होते.

मात्र या सर्वाना मागे टाकत भारतीय प्रशाकीय सेवेतील १९८४च्या तुकडीतील अजोय मेहता यांनी बाजी मारली आहे.

सध्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम करणाऱ्या मेहता यांनी यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव, मुंबई महापालिका आयुक्त, ऊर्जा सचिव आदी महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

महारेरा नंतर आता सनदी अधिकाऱ्यांचे ऊर्जा नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाकडे लक्ष्य लागले आहे. मुख्य सचिव संजय कुमार महिना अखेर सेवानिवृत्त होत असून त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव के ंद्राला पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र मुदतवाढ मिळाली नाही तर संजय कु मार यांचीच ऊर्जा नियामक प्राधिकरणावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.