नाटय़संमेलनाध्यक्ष कीर्ति शिलेदार यांचे प्रतिपादन

प्रसार माध्यमांच्या स्फोटामुळे घरबसल्या करमणुकीने सर्व जिवंत कलाप्रकारांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे ‘नाटकवेडा महाराष्ट्र’ ही आपली ओळख पुसट तर होणार नाही ना, याची चिंता वाटते, असे प्रतिपादन ९८व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाध्यक्षा कीर्ति शिलेदार यांनी बुधवारी केले.

तब्बल २५ वर्षांनी मुंबईत नाटय़संमेलन होत असल्याने आणि ते सलग ६० तास चालणार असल्याने मुंबईकरांचा संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मुलुंडच्या महाकवि कालिदास नाटय़गृहात पहाटे साडेसहाला ‘मराठी बाणा’ने या संमेलनाचा नाटय़जागर सुरू झाला. दुपारी साडेचार वाजता मुलुंडच्या प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या नाटय़दिंडीलाही चांगला प्रतिसाद लाभला. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता उद्घाटन सोहळ्यात शिलेदार यांनी वरील विचारमंथन केले.

या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर शिलेदार यांच्यासह मावळते नाटय़संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर, राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात शिलेदार यांनी रंगभूमीसमोरील समस्यांचा आणि आव्हानांचा ऊहापोह केला. त्या म्हणाल्या, ‘‘पूर्वी नाटय़व्यवसाय परस्परांच्या सहकार्याने यथास्थित चालत असे. पण इतर व्यावसायिक नाटय़ व्यवसायात शिरल्याने झपाटय़ाने परिस्थिती बदलू लागली. पैसेवाल्या लोकांनी या व्यवसायाची गणिते पार बदलली, आता तर प्रसार माध्यमांनीही नाटय़ व्यवसायावर आक्रमण करण्याचा घाट घातला आहे. यावर कोणाचाही अंकुश नाही. अशाने मूठभर लोकांचेच कल्याण होणार आहे.’’

सध्याच्या या घडामोडींनी एकूण नाटय़व्यवसाय ढवळून निघणार आहे.  असे नमूद करून त्या म्हणाल्या की, ‘‘यामुळे प्रेक्षकांच्या खिशावर किती बोजा पडणार तेही कुणी पाहत नाही. पूर्वी नाटय़ संमेलनात आचारसंहितेवर ऊहापोह होत असे. आता नव्याने बदलत्या परिस्थितीचे चिंतन करायला पाहिजे. नाटय़ परिषद आणि सरकारने यात महत्त्वाची भूमिका बजावणे जरूरीचे आहे.’’

अध्यक्षीय भाषणात रंगभूमीच्या सर्व प्रवाहांच्या वाटचालीचा आढावा घेण्याची  परंपरा मोडत कीर्ति शिलेदार यांनी संगीत रंगभूमीच्या गतकाळात डोकावणेच अधिक पसंत केले. काहीशा आत्मकथनपर शैलीत केलेल्या अनलंकृत भाषणात त्यांनी संगीत रंगभूमीच्या गतेतिहासाचा मागोवा घेतला. शिलेदार घराण्याची रंगभूमीबाबतची बांधिलकी त्यांनी विशद केली. संगीत नाटकांच्या तालमी, प्रयोग, नटांमधील कौटुंबिक स्नेह याबद्दलच्या आठवणी सांगून त्या म्हणाल्या की, ‘‘ज्या जमान्यात रेडिओसुद्धा नव्हता त्या काळात संगीत नाटकाने मराठी जनमानसाला उच्च दर्जाची करमणूक देऊन अभिरुचीपूर्ण रसिकता बहाल केली.’’

प्रत्येक कला- परंपरांना कालौघात फटके बसले  आहेत. ‘वरलिया रंगा’ला भुलणाऱ्या प्रेक्षकांना पुन्हा अभिजात कलांकडे वळवून त्यांना रसिकतेचा हरवलेला सूर सापडवून देण्यासाठी सगळ्या प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक, कलाकारांनी एकत्र येऊन उत्तमोत्तम नाटय़कृती बनवाव्यात. त्यांच्या पाठीशी धनवान रसिकांनी आणि सरकारने पूर्ण ताकदीने उभे राहावे आणि रंगभूमी झळाळून निघावी, अशी सदिच्छाही कीर्ति शिलेदार यांनी व्यक्त केली.