मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी बोलावलेली नियामक मंडळ सदस्यांची बैठक आयत्यावेळी रद्द केल्याने विरोधी गटातील नियामक मंडळ सदस्यांनी जागतिक रंगभूमीदिनी निषेधपत्रके दर्शवून पोंक्षे यांच्या विरोधात निदर्शने केली. परंतु ‘सरकारी निर्देशानुसार अशा सभांना बंदी असल्याने ही सभा रद्द करण्यात आली’ असे स्पष्टीकरण अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिले आहे.

‘नियामक मंडळाची सभा २७ मार्च रोजी प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी जाहीर केली होती. सभेचे पत्र आम्हाला १७ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाले. ते १५ ते २० दिवस आधी मिळणे अपेक्षित होते.

जागतिक रंगभूमीदिनी होणाऱ्या सभेत प्रत्येक सदस्य आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक होते. परंतु करोनाचे कारण पुढे करून ही सभा पोंक्षे यांनी रद्द केली.’ असा आरोप नियामक मंडळ सदस्य वीणा लोकूर यांनी केला आहे.  पोंक्षे यांच्या कार्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी नाट्य परिषदेच्या राज्यातील विविध शाखांतील सदस्यांनी निषेधपत्रके झळकवली.

कार्यकारिणी आणि नियामक मंडळ सदस्य अशा दोन सभा २७ मार्च रोजी यशवंत नाट्यमंदिर येथे बोलवल्या होत्या. शासनाने लागू केलेल्या नियमानुसार सभा घेण्यास बंदी आहे. असे असतानाही सभा घेतली तर  नियमांचे उल्लंघन झाले असते आणि नियमानुसार नाट्यगृह करोनाकाळ संपेपर्यंत बंद करण्यात आले असते. म्हणून केवळ नियामक सदस्यांचीच सभा नाही तर कार्यकारिणीची सभा देखील रद्द करण्यात आली. पुढे परिस्थिती निवळली तर सभा नक्कीच घेण्यात येईल. -प्रसाद कांबळी, अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद