शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ९८ व्या अखिल भारतीय नाटय संमेलनात भाषण करताना अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे कौतुक करताना भाजपाला संपर्क फॉर समर्थन अभियानावरुन टोला लगावला. त्यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे तिथे उपस्थित होते. संपर्क अभियान न राबवता प्रसाद कांबळींकडे माणस जोडण्याची कला आहे. तो सर्वांना एकत्र आणू शकतो. खरं आहे ते बोललं पाहिजे असे उद्धव म्हणाले.

सध्या संपूर्ण देशात भाजपाचे संपर्क फॉर समर्थन अभियान सुरु आहे. याच अभियानातंर्गत काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री माधुरी दिक्षित, उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली होती. त्याचवेळी ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनाही भेटले होते. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्याची चर्चा झाली होती.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नाटयसंमेलनात भाषण करताना गिरगाव बिर्ला केंद्र येथे मराठी नाटयसंस्कृतीचे दर्शन घडवणारे दालन महापालिकेतर्फे उभारणार असल्याचे जाहीर केले. नाटयकलेला पावणेदोनशे वर्ष झाली आहेत. तेव्हाची नाटक आता कालबाहय झाली असे आपण म्हणू शकत नाही. कुठलीही उत्कृष्ट कला अजरामर असते असे उद्धव म्हणाले. उत्तम नाटकासाठी टीमवर्क महत्वाचं असतं. नाटक माणसाच्या आयुष्यात आनंदाच वंगण टाकण्याचं काम करतात असे उद्धव म्हणाले. मुलुंडच्या कालिदास नाटयगृहात ९८ वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन सुरु आहे.