विद्या पटवर्धन, रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुलुंड येथील महाकवी कालिदास नाटय़ संकुलात १३ ते १५ जून दरम्यान होऊ  घातलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनातील विविध समारंभ, कार्यक्रम विनाखंड सलग ६० तास चालणार आहेत. हे यंदाच्या संमेलनातील प्रमुख नावीन्य असेल, अशी माहिती नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी गुरुवारी दादर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ज्येष्ठ नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नाटय़ परिषदेने केली. बाल रंगभूमीसाठी निस्वार्थी भावनेने आयुष्य वेचणाऱ्या विद्या पटवर्धन आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. यासह ३८ पुरस्कारही जाहीर करण्यात आले.

२५ वर्षांंनी मुंबईत होत असलेल्या नाटय़ संमेलनात लोककलांचा जागर होणार आहे. मुंबईकर नाटय़ रसिकांना रंगभूमी, त्यावरील कलाकार, त्यांचा अभिनय नवा नाही. पण याच रंगभूमीशी नाते सांगणाऱ्या अनेक लोककलांची माहिती, त्यातला गोडवा मुंबईतल्या किंवा शहरी भागांतल्या तरुण रसिकांना मिळावा या उद्देशाने या नाटय़ संमेलनात संगीतबारी, लावणी, झाडेपट्टी, नमन, दशावतार अशा लोककलांचे सादरीकरण अंतर्भूत केल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले.

महाकवी संकुलात म्हणजेच संमेलनात सहभागी झाल्यानंतर रसिकांनी नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटावा, माघारी फिरताना आठवणींचा ठेवा बरोबर घेऊन जावे याची जाणीव ठेवून संमेलनातील कार्यक्रमांची आखणी, आयोजन करण्यात आले आहे. यात रसिकांसाठी सुखद धक्का देणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल असेल. मात्र त्या कार्यक्रमांची माहिती नेमक्या वेळी जाहीर केली जाईल, असे कांबळी यांनी सांगितले.

यंदाचे हे पहिलेच संमेलन असेल ज्यात सरकारकडे कोणतीही मागणी केली जाणार नाही. मुळात संमेलन हे मागण्या मांडण्याचे माध्यम नाही, असा दावाही कांबळी यांनी केला.

मुंबईसारख्या शहरात अखिल भारतीय नाटय़ संमेलनाचे आयोजन ही निश्चित खर्चिक बाब आहे. त्यामुळे पाच पटीने खर्च होऊ शकेल. मात्र हा खर्च रसिकांच्या सोयी—सुविधा लक्षात घेऊन नेमक्या प्रमाणात केला जाईल. खर्चाचा ताळेबंद ३० जूनच्या सुमारास जाहीर केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.

सांस्कृतिक आबादुबी या शीर्षकाखालील परिसंवाद, दृष्टीहीन मुलांनी साकारलेले अपूर्व मेघदूत, ‘इतिहास गवाह है’ ही एकांकिका, संगीत नाटकांच्या प्रवासावर भाष्य करणारा कार्यक्रम, प्रकट मुलाखत; ही या संमेलनातील काही ठळक वैशिष्टय़े आहेत.