१७ वर्षांनंतरही पाच कोटींचा निधी जमा करण्याचे उद्दिष्ट अपूर्ण
राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान किंवा धनदांडग्या राजकारण्यांच्या पैशांच्या मदतीवर अवलंबून न राहता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वयंपूर्ण व्हावे आणि महामंडळाच्याच पैशातूनच त्याचे आयोजन केले जावे, या उद्देशाने ‘महाकोष’ तयार करण्यात आला. पाच कोटी रुपये जमा करून त्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी साहित्य संमेलन घेण्याचे ठरविण्यात आले. मात्र गेल्या १७ वर्षांत महामंडळाच्या ‘महाकोषात’ सुमारे एक कोटी जमा झाले असल्याने ‘महाकोषा’ची तिजोरी रिकामीच राहिली आहे.
गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलन खर्चाच्या आकडय़ांनी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे केली असून संमेलनाचे आयोजन धनदांडग्या राजकारण्यांच्या हातात गेले आहे. तसेच राज्य शासनाकडून मिळणाऱ्या २५ लाख रुपयांच्या मदतीवर महामंडळाला अवलंबून राहावे लागत आहे. साहित्य संमेलन स्वयंपूर्ण व्हावे व त्याच्या आयोजनासाठी अशा प्रकारचा निधी असावा, अशी मूळ कल्पना १९५८ मध्ये मालवण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात आत्माराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांनी मांडली होती.
१९९९ मध्ये दादर येथे कवीवर्य वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाच्या उद्घाटक आणि साहित्य महामंडळाच्या तत्कालिन अध्यक्षा वसुंधरा पेंडसे-नाईक यांनी पुन्हा एकदा ‘महाकोषा’च्या कल्पनेचा पुनरुच्चार केला. दिवंगत साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष प्रा. सुभाष भेंडे यांनीही काही कार्यक्रम करुन महाकोषासाठी निधी जमविण्याचा प्रयत्न केला. कमलाबाई बाबाजी राव यांच्या कन्या मालतीबाई यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ पाच लाखांची देणगी दिली होती. त्याच्या व्याजातून दरवर्षी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात येते.
महाकोषात ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात निधी जमायला हवा होता तो अद्याप झालेला नाही. तसेच त्यासाठी काही अपवाद वगळता ठोस प्रयत्न झाले नाहीत हे वास्तव आहे. महाकोषात पुरेसा निधी जमा झाला असता तर दरवर्षी साहित्य संमेलनासाठी राज्य शासन किंवा धनदांडग्यांकडे हात पसरण्याची वेळ महामंडळावर आली नसती.

साहित्य महामंडळ चालविण्यासाठी ‘निधी संकलन समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. त्या धर्तीवर महाकोषातही जास्तीत जास्त आर्थिक निधी जमा व्हावा म्हणून वेगळी समिती स्थापना करता येईल का? काही वेगळे ठोस उपाय काय करता येतील? त्यावरही जरुर विचार केला जाईल.
– डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ