16 February 2019

News Flash

बडोदा साहित्य संमेलनावर ‘भाजप’चे वर्चस्व

उद्घाटन, समारोप सोहळ्यातून शिवसेना हद्दपार

भारतीय जनता पार्टी ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

उद्घाटन, समारोप सोहळ्यातून शिवसेना हद्दपार

भारतीय जनता पक्षाची अबाधित सत्ता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे आपले वर्चस्व ठेवले आहे. तीन दिवसांच्या कार्यक्रमपत्रिकेत उद्घाटन, समारोप किंवा अन्य कोणत्याही सोहळ्यात शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांना, खासदारांना किंवा अन्य नेत्यांना कुठेही स्थान देण्यात आलेले नाही.

साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, १६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी चार ते सात या वेळेत होणार आहे. या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, महाराष्ट्राचे सांस्कृतिक, मराठी भाषा विभागमंत्री विनोद तावडे, गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा आदी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास शिवसेनेचा कोणीही सर्वोच्च नेता किंवा लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार नसल्याचे साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून स्पष्ट झाले आहे.

साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शन आणि कवी कट्टा उद्घाटनासाठीही अनुक्रमे मावळते साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे आणि सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना आमंत्रित करण्यात आले. समारोप सोहळाही साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली साजरा होणार आहे. त्यामुळे एकूणच साहित्य संमेलन आणि ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन, समारोप आणि अन्य सोहळ्यात शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांना, लोकप्रतिनिधींना स्थान देण्यात आलेले नाही.

‘कोणतेही राजकारण नाही’

संमेलन आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्यम परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, फडणवीस आणि रुपाणी यांना पक्षीय नेते म्हणून नव्हे तर राज्य शासनाचे प्रतिनिधी या नात्याने आम्ही बोलाविले आहे. ‘महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र चरित्रसाधने’ ग्रंथाच्या प्रकाशनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे विनोद तावडे अध्यक्ष आहेत. हा ग्रंथ ज्यांनी प्रकाशित केला आहे ते महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ मराठी भाषा विभागाच्या अखत्यारित येते. त्यामुळे चरित्र साधने समितीचे अध्यक्ष आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून तावडे यांना बोलाविले आहे. शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना नबोलाविण्यामागे कोणतेही राजकारण नाही.

पक्षीय राजकारण नको – गोऱ्हे

या संदर्भात शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, साहित्य संमेलनात पक्षीय राजकारण नको, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

First Published on February 12, 2018 1:07 am

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan 2018