बडोदा साहित्य संमेलनाचे गीत तयार

बडोदा येथे पुढील महिन्यात होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ‘जिंगल गीत’ तयार करण्यात आले असून साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धीसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. ‘धन्य आमुची सयाजी नगरी, धन्य आमुची बडोदे नगरी’, असे याचे शब्द आहेत.

सामाजिक माध्यमांवरून साहित्य संमेलनाची प्रसिद्धी आणि जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी संमेलनाला यावे यासाठी जरा वेगळ्या पद्धतीने त्यांना आवाहन करण्यासाठी हे संमेलन जिंगल तयार करण्यात आले असल्याची माहिती जिंगलचे संकल्पनाकार आणि बडोदा साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धी समितीचे प्रमुख संजय बच्छाव यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

जिंगलचे लेखन चंद्रशेखर अग्निहोत्री यांनी तर जिंगलच्या शेवटी साहित्यप्रेमी आणि रसिकांनी संमेलनाला यावे, असे आवाहन मंगेश खोपकर यांनी केले आहे. जिंगलचे संगीत स्वरित केळकर यांचे असून त्यांनीच ते गायलेही आहे. याविषयी स्वरित म्हणाले, ८३ वर्षांनंतर बडोदा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून सर्व बडोदेकरांसाठी ही महत्त्वाची आणि बहुमानाची गोष्ट आहे. त्यासाठी आम्ही हे जिंगल तयार केले आहे.

जास्तीत जास्त लोकांनी भ्रमणध्वनीवर हे जिंगल ‘रिंग टोन’ किंवा ‘कॉलर टय़ून’ म्हणून ठेवण्यासाठी संमेलन आयोजक  प्रचार करणार आहेत.

मान मिळाला संपादना

गौरव आहे गुजरातीचा

एक भाषा भगिनी प्रांताचा

मेळावा माय मराठीचा

अशा शब्दात साहित्य संमेलनाचे महत्त्व सांगण्यात आले असून

माय बोलीच्या रसिकांनो

या करु साजरा उत्सव सगळे

मिळुनी माय मराठीचा..