९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घ्यायचे की नाशिकमध्ये, यावरून महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि पुणे, मुंबईतील सदस्यांमध्ये रविवारी औरंगाबादेत झालेल्या बैठकीत खडाजंगी झाली. ‘‘तुम्ही परस्पर निर्णय कसा घेऊ शकता,’’ असा प्रश्न विचारून या सदस्यांनी ठाले-पाटील यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. दिल्लीतील प्रस्तावानुसार तेथेही जाऊन संमेलनस्थळाची पाहणी करावी, अशी आग्रही भूमिका पुणे, मुंबईच्या सदस्यांनी मांडली.

बैठकीत कौतिकराव ठाले -पाटील यांनी मराठी मुलखाबाहेर घेतलेल्या संमेलनाला मिळणाऱ्या प्रतिसादावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इंदूर, बडोदा येथील संमेलनाला उपस्थित मराठी माणसांची आकडेवारीचा मुद्दा त्यांनी मांडला. बडोद्यातील संमेलनाच्या उद्घाटनाला दीड हजारांच्या आसपास तर इंदूरलाही तोकडीच संख्या होती. असे असताना दिल्लीत संमेलन घेण्यात काय हशील? शिवाय दिल्लीत एकदा संमेलन दिले होते. मात्र, त्यांनी नंतर प्रस्ताव मागे घेतला. आताही संमेलन घेण्यासाठी प्रस्ताव देणारी संस्था पुण्याची. त्यात त्यांनी मे महिन्यात संमेलन घेण्याची तयारी दर्शवली आहे. आर्थिक वर्षांचा विचार केला तर ३१ मार्चपूर्वीच संमेलन घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे नाशिकचा विचार करून तेथे जाऊन संमेलनस्थळाची पाहणी करण्यासाठी समिती नियुक्त केली असल्याचे कौतिकराव ठाले- पाटील यांनी सांगितले.

साहित्य महामंडळाच्या रविवारी येथे झालेल्या बैठकीला बृहन्महाराष्ट्र विभागातील सदस्य उपस्थित नसल्याची माहिती आहे. त्यावर करोनामुळे अनेक जण आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. छत्तीसगडचे कपूर वासनिक बैठकीला होते, असे ठाले पाटील यांनी सांगितले.

मराठवाडा-विदर्भाची युती

दिल्लीत संमेलन घ्यावे, यासाठी पुणे व मुंबईचे पदाधिकारी आग्रही होते. जिथे पिकते तिथे विकत नसते. त्यामुळे दिल्लीत संमेलन घ्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याला ठाले- पाटील यांनी विरोध केला. बैठकीत मराठवाडा व विदर्भातील सदस्यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. पुढील वर्षी विदर्भ साहित्य संघाला शंभर वर्षे होत आहेत. त्यामुळे त्यांना ठाले-पाटील यांनी संमेलन विदर्भात देऊ, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळेच त्यांनी दिल्लीवरील चर्चेत गप्प राहणे पसंत केले, असे महामंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

७ जानेवारीला नाशिकमध्ये स्थळपाहणी

ठाले- पाटील यांनी नाशिकमधील स्थळ पाहणीसाठी समिती निश्चित केली आहे. समितीमध्ये महामंडळाचे ठाले -पाटील यांच्यासह कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रदीप दाते, प्रकाश पायगुडे यांचा समावेश आहे. ही समिती ७ जानेवारीला नाशिकमध्ये जाऊन स्थळपाहणी करणार आहे. त्यानंतर ८ जानेवारीला पुन्हा बैठक होईल. त्यामध्ये संमेलन स्थळाचा निर्णय होईल, असे कार्यवाह दादा गोरे व कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी सांगितले.