चौपट दराने विक्री; सिगारेट, तंबाखूही चढय़ा दराने 

संदीप आचार्य/ निशांत सरवणकर

संचारबंदीने काळ्या बाजारात मद्य विक्री जोरात सुरू आहे. साधारण १३०० रुपयांच्या बाटलीला ३,५०० रुपये मोजले जात आहेत. दारूसाठी हवी तेवढी रक्कम मोजून वेगवेगळ्या ठिकाणच्या बारमधून दारू खरेदी करीत आहेत. वाइन शॉप व बार बंद झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी हातभट्टीचा धंदा पुन्हा जोरात सुरू झाला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस कितीही लक्ष ठेवून असले तरी त्यांचा डोळा चुकवून चौपट दराने मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी दारूची विक्री सर्रास सुरू आहे. प्रमुख कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या किमान चौपट दराने विकल्या जात आहेत. वाइन शॉपमध्ये साडेतीन हजार रुपयांना मिळणारी बाटली आज १२ हजार रुपयांना विकली जात आहे. साधारणपणे ६०० ते १३०० रुपयांना मिळणाऱ्या दारूच्या बाटल्या दीड हजारापासून साडेचार हजार रुपये किमतीला मिळत आहेत. विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या बारमधील मंडळी करताना दिसतात. त्यातही दमणमधून बनावट दारू वेगवेगळ्या कसरती व करामती करून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एका ठिकाणी रिकाम्या गॅस सिलिंडरचा तळ कापून त्यामध्ये दारूच्या बाटल्या लपवून आणल्याचे दिसून आले. आता सरकारने शेतमाल, अंडी, मांस आदींच्या विक्री व वाहतुकीला परवानगी दिल्याने बेकायदेशीर दारू वाहतुकीला रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

आतापर्यंत ७१५ गुन्हे दाखल केले असून जवळपास दोन कोटी रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. २७७ लोकांना या प्रकरणी अटकही करण्यात आली असून पोलिसांच्या सहकार्याने कारवाईचा वेग वाढवला जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

सिगारेट, तंबाखूचीही दरवाढ!

दारूबरोबरच सिगारेट व तंबाखूची विक्री मागच्या दाराने जोरात सुरू आहे. २०० ते ४०० रुपयांना सिगारेटचे एक पाकिट विकले जात आहे तर तंबाखूची सात रुपयाला मिळणारी पुडी शहरी भागात ३० ते ४० रुपयांना विकली जात आहे. पोलीस बंदोबस्तात अडकल्याचे लक्षात घेऊन जागोजागी स्थानिक झोपडपट्टी दादांनी तसेच ग्रामीण भागात हातभट्टी बनविण्याचे काम जोरात सुरू झाले आहे.

दमण तसेच राज्याबाहेरून येणारी दारूची वाहतूक रोखण्यासाठी सर्व चेकनाके तसेच महत्त्वाच्या ठिकाणी आमची भरारी पथके लक्ष ठेवून आहेत. आमच्यापुढे आज खरे आव्हान आहे ते हातभट्टीचे. यापूर्वी हातभट्टीने अनेकांचे बळी घेतले आहेत. याविरुद्घ जोरदार कारवाई सुरू केली आहे

-कांतिलाल उमप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क