शहरात दबा धरून राहणाऱ्या दहशतवाद्यांपासून जनतेने सावधानता बाळगावी या हेतूने दहशतवादीविरोधी पथकाच्या वतीने सध्या ठाणे जिल्ह्य़ात ठिकठिकाणी स्थानिक केबल चालकांच्या बैठका आयोजित करण्यात येत आहेत. शनिवारी अंबरनाथमधील सूर्योदय सभागृहात आयोजित सभेत दहशतवादीविरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल होनराव आणि ठाणे विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांनी केबल चालकांना मार्गदर्शन केले.
सर्वसाधारणपणे दहशतवादी ज्या परिसरात अथवा इमारतीमध्ये आश्रयास असतात, तिथे ते कुणालाही येऊ देत नाहीत. दूध, वर्तमानपत्र अथवा केबल जोडणीही ते घेत नाहीत. केबल चालकांचा शहरात सर्वत्र वावर असतो. त्यामुळे असे एखादे संशयित कुटुंब आढळल्यास त्यांनी त्वरित दहशतवादविरोधी पथकास कळवावे, असे आवाहन या वेळी करण्यात  आले. संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रेही या वेळी केबल चालकांना दाखविण्यात आली. प्राचीन मंदिरे आणि गर्दीचे ठिकाण दहशतवाद्यांचे टार्गेट असू शकते.