’अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली.  संततधारेमुळे शहराच्या अनेक भागांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी साचले. परिणामी वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

’शनिवारी सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयांसह संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

’ शुक्रवारी मुंबईत झालेल्या पावसाने ३८ ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांचा खोळंबा झाला. अंधेरी सबवे आणि किंग्ज सर्कल भागात तुलनेने जास्त पाणी होते.

कोकणासह विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा

पुणे : उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्याच्या बहुतांश भागात सध्या पाऊस हजेरी लावतो आहे. कोकण विभागातील मुंबई आणि परिसरात शुक्रवारी (३ जुलै) मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकणात चोवीस तासांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. उर्वरित राज्यातही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. शनिवारी कोकण विभागात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे कोकणपासून विदर्भापर्यंत विविध ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे. शुक्रवारी मुंबई परिसरात तुफान पाऊस झाला. संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुंबईत १६१ मिलिमीटर, तर सांताक्रुझ केंद्रात १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोकण विभागात गेल्या चोवीस तासांत मालवण येथे २००, तर कणकवली येथे १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कुडाळ, रत्नागिरी, वेंगुर्ला आदी ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, आजरा, राधानगरी येथे मोठय़ा पावसाची नोंद झाली. मराठवाडय़ात नाहूर, शेलू, आष्टी, तर विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली.

मुंबईत मुसळधार

मुंबई : गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावली. पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सकाळी ११ पर्यंत कोसळत होता. संततधारेमुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. कफ परेड, मुंबई सेंट्रल, चिराबाजार, हिंदमाता, अंधेरी मिलन सबवे, किंग्ज सर्कल यांसह अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी साचले.  परिणामी वाहतुकीचा वेग मंदावला, तर अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली. पाऊस कोसळत असताना समुद्राला भरती आली होती.

पर्जन्यभान.. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असणार आहे. पुढील एक ते दोन दिवसांत कोकण विभागात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या किनारपट्टीवर या काळात सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे.