News Flash

अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील अलिबाग हे विस्तृत समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे

(संग्रहित छायाचित्र)

रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. या पर्यटनस्थळांना  ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने शासनामार्फत येथे विविध पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल. यामुळे येथील पर्यटनाला मोठय़ा प्रमाणात चालना मिळेल, असे ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील अलिबाग हे विस्तृत समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. समुद्रातील शिवकालीन ऐतिहासिक कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची समाधी, १५० वर्षे जुनी ब्रिटिशकालीन वेधशाळा, श्रीकनकेश्वर, श्रीसिद्धेश्वर, श्रीरामेश्वर, श्रीबालाजी मंदिर, श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर इत्यादी शिवकालीन पुरातन मंदिरे, ज्यू समाजाचे प्रार्थना मंदिर, हिराकोट किल्ला व तलाव, खांदेरी व उंदेरी किल्ले इत्यादी ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथे आहेत.

मुरुड-जंजिरा शहराच्या वेशीवर श्री कोटेश्वरी ग्रामदेवतेचे, तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री भोगेश्वर मंदिर तसेच श्री लक्ष्मी नारायण व इतर पुरातन मंदिरे आहेत. मुरुड – जंजिरा हा ऐतिहासिक जलदुर्ग असून या जलदुर्गास देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. जवळच असलेले फणसाड अभयारण्य हेही पर्यटकांसाठी आकर्षण स्थळ आहे. श्रीवर्धन नगर परिषद क्षेत्रात कालभैरव, जीवनेश्वर, सोमजादेवी, कुसुमावती इत्यादी देवस्थाने व पेशवे मंदिर इत्यादी वास्तू पेशवाई किंवा त्याअगोदरच्या काळातील आहेत. तसेच श्रीवर्धन येथे सुमारे ४ किमी लांबीचा समुद्रकिनारा असून येथे मोठय़ा प्रमाणावर पर्यटक भेट देतात.

राज्य शासनामार्फत कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत बीच श्ॉक धोरण मंजूर करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग येथील वर्सोली समुद्रकिनारा आणि श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याचा विकास करण्यात येणार आहे.

कोकणातील इतर जिल्ह्य़ातील समुद्रकिनाऱ्यांचाही या धोरणांतर्गत विकास करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमध्ये हॉटेल ताज ग्रुप गुंतवणूक करत असून चिपी विमानतळही लवकरच सुरू होत आहे. आता रायगड जिल्ह्य़ातील ३ पर्यटनस्थळांना ब वर्गाचा दर्जा देण्यात येत असून या पर्यटनस्थळांना या दर्जाप्रमाणे सोयीसुविधा व निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 12:10 am

Web Title: alibag murud janjira and shrivardhan have been accorded b category tourist status abn 97
Next Stories
1 विजेवरील वाहन खरेदीकडे कल
2 करोना केंद्रांतील ‘व्हेंटिलेटर’ आता पालिकेच्या रुग्णालयांत
3 धारावीत पुन्हा चाचण्यांत वाढ
Just Now!
X