संदीप आचार्य 
मुंबई: मुंबई महापालिका व आरोग्य विभागाने कालपर्यंत करोना मृत्यूची जी आकडेवारी जाहीर केली त्यापेक्षा ४५१ मृत्यू अधिक असल्याचे स्पष्ट झाले. याचाच अर्थ पालिकेने हे मृत्यू लपवल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून ‘लोकसत्ता’ दिलेल्या वृत्ताची दखल घेत “मुंबई महापालिकेतील तसेच राज्यातील सर्व करोना मृतांची माहिती दोन दिवसात आपण जाहीर करू तसेच मुंबई महापालिकेत याबाबत कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करू” असे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

मुंबई महापालिका रुग्णालयांत आजपर्यंतआजपर्यंत झालेले करोना रुग्णांचे मृत्यू व वास्तविक मृत्यूचे आकडे यात ४५१ मृत्यूंची तफावत दिसून आली आहे. याशिवाय जवळपास ५०० मृत्यूंचे विश्लेषण ‘डेथ ऑडिट कमिटी’ने गेल्या आठवड्यापर्यंत केले नव्हते. पालिकेने ८ जून रोजी आरोग्य विभागाला पाठवलेल्या मेल मध्ये ४५१ मृत्यू हे करोना चे मृत्यू असल्याचे नमूद केले होते तर १२ जून रोजी पाठवलेल्या दुसऱ्या मेलमध्ये हे करोनाचे मृत्यू नाहीत असे म्हटले आहे.

मुंबई महापालिकेच्या ‘डेथ ऑडिट कमिटी’च्या एका सदस्याच्या म्हणण्यानुसार समितीने सर्व मृत्यू करोनाचे असल्याचे पालिका प्रशासनाला कळवले होते. मग हे मृत्यू करोनाचे नाहीत हा मेल १२ जून रोजी कोणी पाठवला व का पाठवला हा प्रश्न अनुत्तरित राहातो. ‘लोकसत्ता’ने या लपवलेल्या ४५१ करोनाची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी तात्काळ दखल घेऊन राज्यातील सर्वच करोना मृत्यूंचा आढावा घेऊन खरी आकडेवारी दोन दिवसात जाहीर केली जाईल असे सांगितले.

आणखी वाचा- धक्कादायक: मुंबईतील ४५१ करोना मृत्यूंचं गूढ; पालिकेची भूमिका वादाच्या भोवऱ्यात!

“मुंबई महापालिका, ठाणे तसेच पुणे महापालिकेसह सर्वच महापालिकांमधील करोना मृत्यूचे वास्तव चित्र आम्ही जाहीर करू. आम्हाला मृत्यूचे आकडे लपवायचे नसून जे सत्य आहे ते सांगितले जाईल”, असे अजोय मेहता म्हणाले. “मुंबई महापालिकेतील ४५१ मृत्यूंच्या प्रकरणी तसेच शिल्लक मृत्यूंचे वेळेत विश्लेषण का झाले नाही, याची चौकशी केली जाईल” असेही मुख्य सचिवांनी सांगितले. “यापुढे राज्यातील सर्वच करोना रुग्ण, त्यांचे चाचणी अहवाल, घरी क्वारंटाइन केले की रुग्णालयात दाखल केले तसेच रुग्णालयातील उपचार, बरे झाल्याचा वा मृत्यू झाल्यास त्याचा तपशील या सर्वांच्या अचूक माहिती ६ जूनपर्यंत एकत्रित करणे सर्व जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना बंधनकारक केले असून १५ जूनला पाच वाजल्यापासून सर्व माहिती रोजच्या रोज व्यवस्थित संकलित केली जाईल व्यवस्था निर्माण झालेली असेल” असेही मुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले. “मुंबई महापालिका रुग्णालयातील करोना मृत्यूंप्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करून सत्य बाहेर काढले जाईल व जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, असे अजय मेहता यांनी स्पष्ट केले.