शक्ती मिल परिसरात गेल्या वर्षी आधी टेलिफोन ऑपरेटर व नंतर महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पाचही आरोपींना आज (गुरूवार) सत्र न्यायालयातर्फे दोषी ठरवण्यात आले. आरोपींना नेमकी काय शिक्षा व्हावी यावर उद्या (शुक्रवार) दोन्ही बाजूंच्या वकिलांतर्फे युक्तीवाद करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची शिक्षा ठरवण्यात येईल.
दोन्ही खटल्यांतील आरोपी विजय जाधव, मोहम्मद कासीम शेख ऊर्फ कासीम बंगाली, सिराज रहमान, इश्फाक शेख आणि सलीम अन्सारी यांच्यावर कट रचणे, बलात्कार करणे, अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणे, डांबून ठेवणे, पुरावे नष्ट करणे आदी आरोपांअंतर्गत खटला चालविण्यात आला.
तसेच महिला छायाचित्रकारावरील सामूहिक बलात्कार प्रकरणात बलात्काराचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा नवा आरोपही आरोपींवर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, अत्यंत कमी वेळेत पिडित महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यक्त केली. या घटनेनंतर महिलांच्या सुरभेच्या बाबतीत अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून, निकालामुळे गुन्हेगारांमध्ये एक कडक संदेश गेला असल्याचेही ते पुढे म्हणाले.