संपर्कातील व्यक्तींचा पालिकेकडून शोध सुरू

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन, पुत्र अभिषेक यांच्यापाठोपाठ सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांनाही करोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे मुंबई महापालिकेने रविवारी जुहू येथील बच्चन कुटुंबीयांचे चार बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. गेल्या १४ दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध पालिकेने सुरू केला आहे.

बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्यामुळे पालिकेने रविवारी ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे त्यांचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून टाळेबंद केले. चारही बंगले र्निजतुक करण्यात आले असून पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांतील सुमारे ३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नवेली, अगस्त नंदा यांची चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्याचे सूत्रांकडून समजले.

‘जलसा’ बंगल्यामध्ये तेथील कर्मचाऱ्यांना अलगीकरण करण्याची व्यवस्था असून त्यासाठी आवश्यक ती मदत पालिकेकडून करण्यात येत आहे. टाळेबंदीच्या काळापासून चारही बंगल्यांमधील कर्मचारी तेथेच वास्तव्यास होते. त्यामुळे बच्चन कुटुंबातील चौघांना नेमका कशामुळे करोनाची बाधा झाली याची चाचपणी पालिका अधिकारी करीत आहेत.

याआधीही अभिनेते किरण कुमार, निर्माते करीम मोरानी आणि मुलगी अभिनेत्री झोया मोरानी, गायिका कनिका कपूर, संगीतकार वाजिद खान यांना करोनाची लागण झाली होती. वाजिद खान यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर इतरांनी करोनावर मात केली आहे.

ती चित्रफीत जुनी..

करोनाचे निदान झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले गेले. पाठोपाठ त्यांची एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यात ते करोनायोद्धय़ांचे कौतुक करताना दिसतात. मात्र ही चित्रफीत जुनी असून एप्रिल महिन्यात करोना रुग्णांच्या उपचारासाठी विशेष कक्ष सुरू के ल्या तेव्हा अमिताभ यांनी पीपीई किट दिले होते. त्या वेळची ही चित्रफित असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

अनुपम खेर यांच्या कुटुंबीयांना संसर्ग

ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनीही आपल्या घरात करोनाचा शिरकाव झाल्याची माहिती ट्वीटरद्वारे दिली. अनुपम खेर यांची आई दुलारी, भाऊ अभिनेता राजू खेर, भावजय आणि पुतणी अशा चौघांनाही करोनाची लागण झाली आहे. आईला तात्काळ कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे खेर यांनी म्हटले आहे.

जावेद अख्तर यांचाही बंगला टाळेबंद

प्रख्यात अभिनेत्री रेखा यांच्या बॅण्ड स्टॅण्ड येथील बंगल्यावरील सुरक्षा रक्षकाला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रेखा यांचा बंगला टाळेबंद करण्यात आला. दरम्यान, रेखा यांच्या शेजारीच असलेल्या गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या बंगल्यातील दोन सुरक्षा रक्षकांना लागण झाल्याचे उघकीस आले. त्यामुळे पालिकेने त्यांचाही बंगला रविवारी टाळेबंद केला.