लक्षणे नसलेल्या करोनाबाधितांना दाखल न करण्याचे आदेश पालिकेने खासगी रुग्णालयांना दिले आहेत. तसेच खासगी प्रयोगशाळांनीही चाचणीचा अहवाल थेट रुग्णांना देऊ नये, अशी सूचना पालिके ने दिली आहे.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाटय़ाने होत असून दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या हजारापर्यत पोहोचली आहे. यादृष्टीने रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह सोमवारी बैठक आयोजित केली होती. यात पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांचे प्रतिनिधी सहभागी होते. लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करू नये. दाखल रुग्ण आणि उपलब्ध खाटा याची माहिती देणारे डॅशबोर्ड आणि रुग्णालयातील फलक वेळोवेळी अद्ययावत केले जावेत, अशा सूचना यावेळी रुग्णालयांना देण्यात आल्या.

८० टक्के खाटा राखीव

बाधितांमधील बहुतांश रुग्ण हे मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू गृहसंकुलातील आहेत. या रुग्णांचा खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्याकडे कल अधिक असतो. त्या दृष्टीने ८० टक्के राखीव खाटा तयार ठेवण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच रुग्णांना पालिकेच्या नियंत्रण कक्षाद्वारेच दाखल केले जावे. एखादा रुग्ण थेट रुग्णालयात आल्यास त्याला दाखल केल्याची माहिती संबंधित नियंत्रित कक्षाला तातडीने कळविणे बंधनकारक आहे. दवाखान्यात लक्षणे असलेली संशयित व्यक्ती आल्यास तात्काळ चाचणी करुन घ्यावी. तसेच यांचा पाठपुरावा करण्यासाठी व्यक्तीचा पूर्ण पत्ता पिनकोडसह नोंदवावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच चाचणी अहवाल २४ तासांत तयार होईल असे प्रयत्न करण्याची सूचना प्रयोगशाळांना दिली आहे.

खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा राखीव

खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा अजूनही करोनाबाधितांसाठी राखीव आहेत. मधल्या काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने या खाटा कमी करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडला होता. परंतु आता रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने ही मागणी मागे घेतली आहे. खासगी रुग्णालयातील सर्व खाटा सोईसुविधांसह सज्ज आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कितीही वाढली तरी उपचार वेळेत दिले जातील, असे खासगी रुग्णालयाचे समन्वयक आणि बॉम्बे रुग्णालयाचे कन्सल्टंट फिजिशियन  डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले.

चाचणीचा अहवाल रुग्णांना थेट नाही

चाचण्या वाढविण्यावर पुन्हा भर देण्यात येईल. आवश्यकता असेल तिथे चाचणी शिबिरे घेतली जातील. रुग्णालयांना अतिदक्षता विभाग, ऑक्सिजन, रुग्णवाहिकेसह सर्व सेवा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रयोगशाळांनी थेट अहवाल रुग्णांना कळवू नये. भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि पालिकेला अहवाल पाठवावेत. पालिकेकडून रुग्णांना कळविले जाईल, असा आदेश यावेळी खासगी प्रयोगशाळांना  दिल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.