‘ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) च्या धर्तीवर केंद्रातील आयुष मंत्रालयाने दिल्लीमध्ये सुरू केलेल्या ‘एम्स आयुर्वेद’च्या धर्तीवर महाराष्ट्रात आयुर्वेद संशोधन व शिक्षणाला चालना मिळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ‘एम्स आयुर्वेद’ सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालयाने घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा या योजनेसाठी निवडण्यामागे पर्यटनाला चालना मिळणे हा आणखी एक हेतू आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांची ही योजना असून यातून राज्यात आयुर्वेदाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल.
देशात आयुर्वेदाची सुसज्ज रुग्णालये असावी असा विचार तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मांडला होता. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘एम्स’च्या धर्तीवर ‘एम्स आयुर्वेद’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत विद्यमान केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पुढाकाराने दिल्लीत अखेर ‘एम्स आयुर्वेद’ला सुरुवात झाली असून पुढील वर्षी त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे.दिल्लीप्रमाणेच अन्य राज्यांनीही ‘एम्स आयुर्वेद’ संकल्पना राबवावी अशी भूमिका केंद्रीय मंत्री नाईक यांनी मांडली होती. त्यानुसार राज्याच्या आयुष संचालनालयाने एक प्रस्ताव तयार केला असून केंद्राकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्यात ‘एम्स आयुर्वेद’ सुरू करण्यास मान्यता मिळावी यासाठी लवकरच सविस्तर प्रस्ताव केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना सादर केला जाणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
* राज्य सरकारकडून ५० एकर जमीन उपलब्ध
* ३०० कोटी रुपयांची योजना
* २०० खाटांचे सुसज्ज आयुर्वेदिक रुग्णालय, संशोधन कें द्र, पदवी ते पीएचडीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था
* आयुर्वेद औषधांची चाचणी तसेच मानकीकरण आणि आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथांचे संशोधन

सिंधुदुर्ग जिल्हा निवडण्यामागे तो गोव्याजवळ असल्यामुळे वैद्यकीय पर्यटनालाही चालना मिळावी हा हेतू आहे. या ठिकाणी १५ एकरामध्ये पंचकर्म तसेच योगा प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्याचा मानस आहे. आयुर्वेदात पंचकर्माला विशेष स्थान असून आयुर्वेदातील शास्त्रशुद्ध पायावर हे पंचकर्म केंद्र असेल. आयुर्वेदात नाडीपरीक्षेला विशेष स्थान असून त्यावरही संशोधन केले जाईल. आयुर्वेदिक औषधांवर संशोधन करून त्याचा प्रचार व प्रसार केला जाईल.
– विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री