मुंबईच्या दिशेने कूच केलेल्या मोर्चाचे स्वागत रविवारी मुंबईकरांनी मोठ्या उत्साहात केले. विशेष म्हणजे सर्वधर्मीय संघटनांनी सढळ हातांनी मोर्चेकऱ्यांना मदत केल्याचे पाहायला मिळाले. उन्हाचा दाह वाढत असताना या परिस्थितीत मोर्चेकऱ्यांसाठी त्यांनी पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराची सोय केली होती. तर मुंबईतील मुस्लीमांनीसुद्धा रात्रीच्या वेळी शहरात दाखल झालेल्या मोर्चेकऱ्यांना पाणी आणि बिस्कीट वाटप केले. मुलुंड ते सोमय्या मैदानापर्यंत वस्त्यांमधून मोर्चेकऱ्यांना पाणी, चहा-बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेल्या अन्नदात्यांची तहान- भूक भागवण्यासाठी शीख समुदायातील लोकांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले. विक्रोळीतील कन्नमवार नगरमधील रहिवाशी, तसेच ‘संत बाबा ठाकर सिंह कारसेवा’, ‘जगदंब प्रतिष्ठान’ यांच्या वतीने मोर्चेकऱ्यांना विविध प्रकारे मदत करण्यात आली. तर, ‘बॉम्बे कॅथॉलिक सभे’च्या वतीने ३० हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

adiba
(छाया सौजन्य- ट्विटर/ adiba)
adiba
(छाया सौजन्य- ट्विटर/ adiba)

शेतमालाला दीडपट हमीभाव, कृषिपंप वीजबिल माफी, स्वामीनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस अजित नवले आदींच्या नेतृत्वाखाली नाशिकहून ६ मार्चला निघालेला हजारो शेतकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी सकाळी मुंबईत झाला.