चर्चा आणि मोर्चा सुरूच राहणार; किसान सभेचा निर्धार

शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, कृषिपंपाचे वीजबिल माफ करा, स्वामीनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा आदी  मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस अजित नवले आदींच्या नेतृत्वाखाली नाशिकहून ६ मार्चला निघालेला हजारो शेतकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी सकाळी मुंबईत झाला. शनिवारी रात्री मुंबईच्या प्रवेशद्वारावर मुलुंड चेकनाक्यावर विश्रांती घेतल्यानंतर रविवारी उन्हाची  पर्वा न करता पूर्व द्रुतगती महामार्गावरून चालत चालत मोर्चेकरी  सोमय्या मैदानावर पोहोचले. आजवर कानाडोळा करणाऱ्या राज्य सरकारने मोर्चाला मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि राजकीय पाठबळाची गंभीर दखल घेत आंदोलनकर्त्यांशी समझोता करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार असून सोमवारी चर्चेतून मार्ग निघेल, स्थानिक पातळीवरील प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असून त्यांचे प्रश्न मार्गी लावू, असे महाजन यांनी या वेळी सांगितले.

तर, सरकारने चर्चेचा प्रस्ताव दिला असून चर्चेची तयारी आहे. मात्र एकाच वेळी चर्चा आणि मोर्चा सुरू राहील, सरकारने मागण्यांची पूर्तता केल्याशिवाय आता माघार नाही, असे नवले यांनी सांगितले. आमच्या आंदोलनास सर्वच क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून मुंबईकरांचाही उद्या, सोमवारी पाठिंबा मिळेल, असा दावा नवले यांनी केला.

पालिकेकडून उपाययोजना

मुंबई : शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर दाखल होणार आहे. त्यामुळे मोर्चेकरी शेतकऱ्यांना आझाद मैदानाच्या आसपासच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा विनामूल्य वापर करू द्यावा, असे आदेश मुंबई महापालिकेने स्वच्छतागृहांच्या चालकांना दिले आहेत. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे, धूम्रफवारणी, त्याचबरोबर स्वच्छता राखण्यासाठी सफाई कामगार सज्ज ठेवण्यात येणार आहेत. आझाद मैदान परिसरात प्रत्येकी १२ हजार लिटर क्षमता असलेले पिण्याच्या पाण्याचे तीन टँकर उपलब्ध केले आहेत. सुमारे १२० शौचकूप असलेली फिरती स्वच्छतागृहेही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

मोर्चा राजकीय अभिनिवेशातूनच -ठाकूर

पनवेल : शेतकऱ्यांचा मोर्चा हा राजकीय अभिनिवेशातून काढण्यात आल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे पनवेल येथील आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून नवीन वादाला तोंड फोडले आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेली कर्जमाफीची योजना तसेच शेतीच्या जोडउद्योगधंदे आणि विविध योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्या असून मोर्चा काढणाऱ्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारवर विश्वास ठेवणे गरजेचे असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ सालापर्यंत दुप्पट व्हावे असा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारने शेतकरी स्नेही धोरण अवलंबले असून त्याच्या अंमलबजावणीत त्रुटी असेल ते दूर करण्याची सरकारची तयारी असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान शेतकऱ्यांसाठी पनवेल शेतकरी कामगार पक्षाने भोजनाची मोठय़ा प्रमाणात व्यवस्था केली.

मोर्चाच्या धसक्याने मंत्रिगटाची नियुक्ती

मुंबई : विधान भावनावर सोमवारी धडकणाऱ्या शेतकरी मोर्चाचा सरकारने धसका घेतला असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सहा ज्येष्ठ मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

शेतकरी मोर्चाच्या पाश्र्वभुमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रविवारी रात्री वर्षां बंगल्यावर चर्चा केली. या बैठकीत दिवसभर घडलेल्या घडामोडींची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. आंदोलक शेतकरी चर्चेला तयार आहेत, असे या बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. तेव्हा शेतकऱ्यांच्या मागण्यांवर किसान सभेच्या शिष्ठमंडळाशी चर्चा करण्यासाठी  चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख या सहा मंत्र्यांची समिती करण्यात आली.

सोमवारी दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने लाखो विद्यर्थ्यांना सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेला कोणतीही बाधा येऊ नये याबाबत खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.

पाठिंब्यासाठी राजकीय पक्षांची स्पर्धा

* शेतकऱ्यांच्या मोर्चाला शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनेही पाठिंबा दिला असून काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चात सहभागी होत आपला पाठिंबा दर्शविला.

* शेतकऱ्यांच्या मोर्चाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसू लागताच या मोर्चाला पाठिंबा देण्यात राजकीय पक्षांमध्ये एक प्रकारची स्पर्धाच सुरू झाली आहे. शिवसेनेने या मोर्चास पाठिंबा देण्याबरोबरच शेतकऱ्यांची व्यवस्थाही केली.

* शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे मोर्चेकऱ्यांच्या सतत संपर्कात असून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे मोर्चात सहभागी झाले. ‘दोन्ही पक्षांचे रंग जरी वेगळे असले तरी आम्ही तुमच्या सोबत असून केवळ पाठिंबा देऊनच थांबणार नाही तर तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू’, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने दिली.

* काँग्रेस पक्षानेही या मोर्चाला पाठिंबा जाहीर करताना, ‘शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील या संघर्षांत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हटवादीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात’, अशी मागणी  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या मोर्चास पाठिंबा देताना सोमवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या मोर्चात पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांसोबत सहभागी होतील, असे जाहीर केले आहे.

* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी सोमय्या मैदानावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे सरकार थापेबाज  असून खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले आहे. सरकारचेच खिसे फाटलेले आहेत. ते तुम्हाला काय देणार?  हे सरकार तुमच्या तोंडाला पाने पुसणार. त्यामुळे तुमच्या मनातील अंगार कायम ठेवा, असे आवाहन राज यांनी यावेळी केले.