काळाचौकी येथील सुमारे ३३ एकरावरील अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्विकासावर असलेला न्यायालयीन अडथळाही दूर झाला आहे. त्यामुळे आता सर्वाधिक गृहनिर्माण संस्थांचे बहुमत मिळविलेल्या रुस्तमजी समूहाच्या मे. किस्टोन रिएल्टर्स वसाहतीचा पुनर्विकास करेल. समूह पुनर्विकासाचा पहिला मान भेंडीबाजारला जात असला तरी सर्वात मोठा समूह पुनर्विकास म्हणून अभ्युदयनगरकडे पाहिले जात आहे.
श्रीपती ग्रुप आणि विजय ग्रुप यांच्यातील स्पर्धेत अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न चांगलाच गाजला होता. त्यानंतर अभ्युदयनगर गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाने पुढाकार घेत निविदा प्रक्रिया राबविली होती. महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था कायद्यातील ७९ (अ) नुसार प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत चार विकासक अंतिम ठरले होते; परंतु प्रत्यक्षात चुरस रुस्तमजी समूहाच्या मे. किस्टोन रिएल्टर्स आणि मे. ऑर्नेट या विकासकांमध्ये होती. आतापर्यंत झालेल्या ३० विशेष सर्वसाधारण सभांमध्ये रुस्तमजी समूहाला २६ तर ऑर्नेटला फक्त चार गृहनिर्माण संस्थांनी पाठिंबा दिल्यामुळे निविदेतील तरतुदीनुसार या वसाहतींचा अंतिम विकासक म्हणून रुस्तमजी समूह ठरला होता. सुरुवातीला ऑर्नेट बिल्डर्सने रुस्तमजी समूहाच्या निविदेलाच आक्षेप घेतला होता; परंतु शहर व दिवाणी न्यायालयाने संघाच्या बाजूने निकाल देत रुस्तमजी यांची निविदा वैध ठरविली होती. या निर्णयाला ऑर्नेट बिल्डर्सने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. नितीन जामदार यांच्यापुढे ही सुनावणी सुरू होती. अखेरीस गुरुवारी न्यायालयाने हे अपील फेटाळून लावल्यामुळे आता ऑर्नेटचे आव्हानच संपुष्टात आले आहे. अ‍ॅड. अप्पासाहेब देसाई यांनी याला दुजोरा दिला.