राज्यातील जिल्हा मुख्यालये लवकरच विमानसेवेने जोडली जाणार आहेत. ‘सुप्रीम एव्हीएशन इंडिया’ या कंपनीने या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला असून ही सेवा यशस्वी होण्यासाठी राज्य सरकारनेही काही भार उचवावा, अशी अपेक्षा या कंपनीने केली आहे.
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याबाबत मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या विमानतळ विकास प्राधिकरणाच्या बैठकीत सुप्रीम एव्हीएशनने हा प्रस्ताव दिला. या कंपनीकडे ११ आसनी विमाने असून कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नाशिक, अमरावती, गोंदिया, लातूर, औरंगाबाद अशा शहरांमघ्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. मात्र ही सेवा आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर ठरावी यासाठी पहिले दीड वर्ष ११ पैकी पाच आसनांची जबाबदारी शासनाने घ्यावी, असा प्रस्ताव कंपनीने दिला आहे. त्यावर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या विमानसेवेची सवलत देण्याचा विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच कंपनीने दिलेला भाडे प्रस्ताव अधिक असल्याने विमानाचे वेळापत्रक, भाडे याबाबतचा तपशील द्यावा अशी सूचना कंपनीस करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

‘उद्योग चालनेसाठी नवे २२ विमानतळ ’
कराड : औद्योगिक प्रगतीत राज्याला अव्वलस्थान प्राप्त होण्यासाठी उद्योजक, गुंतवणूकदारांना प्रोत्साहन व पायाभूत सुविधा देण्याची भूमिका मांडताना, राज्यात अत्याधुनिक २२ विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शासनाला उद्योगात गुंतवणूक करता येत नाही. त्यासाठी खासगी गुंतवणूकदार, उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सोयी-सुविधा देण्याची गरज आहे. उद्योगधंद्यांना चालना मिळावी म्हणून राज्यात प्रगत २२ विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेपरलेस प्रशासनाच्या माध्यमातून कामकाजाला गती देण्यात येत आहे.