नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून अनेक मोदींची नावं कानावर ऐकायला येताहेत आणि हे सगळे मोदी लुटारू असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे. मुंबईतल्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी येचुरी मुबंईत आले असून त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. ललित मोदी, नीरव मोदी, विजय माल्या, मेहुल चोक्सी आदींचा संदर्भ देत येचुरी म्हणाले की सरकारची साथ असल्याशिवाय हे लोक देश सोडून जाऊ शकत नाहीत. या लुटारूंना देश सोडून जाण्यासाठी सरकार मदत करतं परंतु शेतकऱ्यांना मात्र कर्जाच्या वसुलीसाठी त्रास दिला जातो व शेतकरी आत्महत्या करतात असा आरोपही त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आवश्यक असून तसं झालं नाही तर शेतकरी जगणार नाही, आणि शेतकरी तगला नाही तर कुणीच जगणार नाही असं येचुरी म्हणाले. भारताचा कणा हा शेतकरी असून त्याच्या शिवाय देशाला भवितव्य नसेल असं सांगत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सरकारच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये हे सांगतानाच, केवळ लेखी आश्वासन न घेता नक्की किती तारखेला अमलबजावणी होईल हे ही लिहून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. विशेष आर्थिक प्रकल्पासाठी लाखो शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिकीकरणासाठी मागे घेण्यात आल्या होत्या याचा दाखला येचुरी यांनी दिला. जर केवळ उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्न केले, जमिनी घेतल्या तर खाणार काय असा सवालही त्यांनी विचारला आहे. युरोप-अमेरिकेसारख्या देशांमध्ये शेतकऱ्यांना 70 ते 80 टक्के सरकारी अनुदान मिळतं परंतु तिथं मालाला तितकी मागणी नाही, आणि हा माल भारतीय बाजारात खपवता यावं यासाठी इथल्या शेतकऱ्यांचा बळी देण्याचं हे षडयंत्र असल्याचा आरोप येचुरी यांनी केला.

जो जमिन कसतो तोच जमिनीचा मालक असतो असं सांगताना हीच आपली मूळ मागणी असल्याचं सांगताना येचुरी यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद करणं हेच आजचं सरकारचं जमिन सुधार धोरण असल्याची टिका त्यांनी केली आहे. मोदी सरकार सांगतं अच्छे दिन आले आहेत. परंतु सरकारचीच आकडेवारी सांगते की दरवर्षी 20 हजार या गतीने गेल्या तीन ते चार वर्षांत सुमारे 60 ते 80 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दाखल देत हेच का अच्छे दिन असा सवाल येचुरी यांनी विचारला आहे.